इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांच्या एका फोटोने जगात खळबळ; इराणने दिले सडेतोड उत्तर
आखाती देशातील तणाव अद्यापही कायम आहे. यातच आता अमेरिका लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा भाषण न करता सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चक्क इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा फडकताना दाखवला आहे. विशेष म्हणजे त्यावर युनायटेड स्टेट्स ऑफ मिडल ईस्ट, असे लिहिण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या थेट धमकीवजा पोस्टमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिकन माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणवर हल्ला करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत. जर अमेरिका आणि इराणमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही, तर अमेरिका इराणवर मोठा हल्ला करू शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे सध्या तेहरानच्या दौऱ्यावर आहेत. इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम मुनीर यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालिबाफ यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे. या भेटीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
इराणचे सडेतोड उत्तर
ट्रम्प यांच्या या आगळीकीला इराणकडूनही थेट आणि सडेतोड शब्दांत उत्तर देण्यात आले आहे. फिनलंडमधील इराणच्या राजदूतांनी X अकाऊंटवरून ट्रम्प यांच्यावर उपहासात्मक टीका केली. दुसऱ्या देशांवर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यांची खिल्ली उडवत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “एके दिवशी तुम्हाला वाटते की व्हेनेझुएला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनणार आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्रीनलँडचे असे स्वागत करता जणू काही ते ५२ वे राज्य बनणार आहे. माझे शब्द लक्षात ठेवा, ५१ वे, ५२ वे किंवा त्याहून अधिक राज्ये अमेरिकेला जोडण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आणि त्याच्याच धुंदीत राहण्यापेक्षा, तुम्ही या गोष्टीची गंभीरपणे चिंता केली पाहिजे की, कुठेतरी तुम्ही तुमची उरलेली ५० राज्येही गमावून बसू नयेत.” या शाब्दिक चकमकीमुळे आणि वाढत्या लष्करी हालचालींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comments are closed.