बगराम एअरबेस परत द्या, अन्यथा वाईट परिणाम होतील; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला उघड धमकी

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेऊन ऑगस्ट महिन्यात चार वर्ष झाली. या काळात तालिबानने पुन्हा डोके वर काढले आणि अफगाणिस्तानचा ताबा मिळवला. मात्र आता पुन्हा एकदा अमेरिकेने अफगाणिस्तानकडे मोर्चा वळवला असून बगराम एअरबेसवर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. याच संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला उघड धमकी दिली आहे.
अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. चीनला रोखण्यासाठी आम्ही तो एअरबेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमिवर अमेरिकन सैन्याला उतरण्याची परवानगी मिळणार नाही, असे म्हटले. यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक धमकी वजा इशाऱ्याची पोस्ट शेअर केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर म्हटले की, ‘अफगाणिस्तानने बगराम एअरबेस त्याच्या निर्मात्याला अर्थात अमेरिकेला परत केला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील.’ या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली असून अमेरिका पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली. चीनच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला हा एअरबेस हवा आहे.
चीनवर नजर
बगराम एअरबेसवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न आहे. कारण त्यांना (अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांना) आमच्याकडून काहीतरी हवे आहे. त्या एअरबेसवर आम्हाला पुन्हा नियंत्रण हवे आहे. कारण हा एअरबेस चीन अण्वस्त्र बनवतो तिथून तासाभरावर आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
तालिबानने मागणी फेटाळली
दरम्यान, अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या तालिबानने अमेरिकेची मागणी फेटाळली आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी जाकीर जलाल यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. अफगाणिस्तानच्या कोणत्याही भागात अमेरिकन सैन्य उतरण्याची परवानगी न देता अफगाणिस्तान आणि अमेरिकेला एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते.
Comments are closed.