कराराची घाई नाही, अटी न मानल्यास इराणवर हल्ला करणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिका इराणसोबत एक चांगला करार करू इच्छितो, परंतु त्यासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही, असे ट्रम्प म्हटले. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, अमेरिका एक चांगला करार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जर इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर अमेरिका लष्करी कारवाई देखील करू शकते, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांना हा करार हवा आहे कारण यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. आपल्याला कोणतीही घाई नसून चांगल्या कराराला वेळ लागतो आणि घाई केल्यास चांगला करार होणार नाही, असे ते म्हणाले. अमेरिका जे इच्छितो ते त्यांना हळूहळू मिळत आहे. मात्र जर चर्चा यशस्वी झाली नाही आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अमेरिका दुसऱ्या मार्गाने हा विषय संपवेल, असे ते म्हणाले.
इराणचे नेते अतिशय कठोर असून त्यांच्याशी चर्चा करणे सोपे नाही, असे सांगत ट्रम्प यांनी म्हणाले की, असे असले तरी अमेरिका आपल्या अटी पुढे रेटण्यात यशस्वी होत आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी इराक युद्धाचाही उल्लेख करत अमेरिकेने सुरुवातीलाच इराकमध्ये जायला नको होते आणि ती लष्करी कारवाई एक मोठी चूक होती, असे मत मांडले. तसेच अमेरिकेने इराणमध्येही नसायला हवे होते, परंतु इराणच्या अण्वस्त्र क्षमतेमुळे तिथे कारवाई करणे आवश्यक झाल्याचे ते म्हणाले.
Comments are closed.