वैभव, मनाला वाट्टेल तसेच खेळ, माजी कसोटीपटू वेंगसरकरांचा धडाकेबाज सूर्यवंशीला कानमंत्र

>> मंगेश वरवडेकर

वैभव, तुझ्या मनाला वाट्टेल तसेच खेळ. स्वतःचा खेळ कुणाच्या सांगण्यावरून बदलू नकोस. वैभवलाही कुणी असं खेळ, तसं खेळ म्हणून सल्ला देण्याचा फंदात पडू नका. त्याला त्याच्या मनासारखं खेळू द्या, असा कानमंत्र दिलाय हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी.

वय वर्षे अवघी 14 असतानाच क्रिकेट जगताचे वैभव ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती फलंदाजीचे सारेच दिवाने झाले आहेत. त्याची बॅट म्हणजे तोफ झालीय, जी प्रत्येक चेंडूला सीमारेषेपलीकडे फेकतेय. बुधवारीच त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 84 चेंडूंत 190 धावांची विक्रमी खेळी साकारली. ही त्याची सर्वात वेगवान खेळी ठरलीय. त्याच्या या झंझावाताने 36 चेंडूंतच धावांची शंभरी गाठत नवा पराक्रम रचला. त्याच्या या वेगवान खेळीबरोबर एक जोरदार चर्चा सुरू झाली की, तुफानी फॉर्मात असलेल्या या तुफानाची हिंदुस्थानच्या टी-20 संघात निवड का गेली नाही? वैभवसुद्धा हिंदुस्थानी संघात असायला हवा, असे अनेकांचे मत असले तरी वेंगसरकरांचे मत वेगळे आहे. आता हिंदुस्थानी संघात अनेक खेळाडू आहेत जे टी-20 च्या रांगेत आहेत. त्यामुळे सूर्यवंशीला थोडा वेळ लागेल. पण तो जास्त दिवस संघाबाहेर राहू शकणार नाही. तो 2026 मध्ये हिंदुस्थानच्या संघात नक्कीच असेल.

वैभव सूर्यवंशी सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रिंबदू ठरतोय. त्याचा बिनधास्त खेळ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकजण त्याला सल्ला देण्यास उत्सुक आहेत. मात्र वेंगसरकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलेय की, वैभवने कुणाचेही ऐकू नये. त्याला त्याच्या मनासारखे सुसाट आणि बिनधास्त खेळू द्या. त्याचा बिनधास्त खेळच प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करण्यास पुरेसा आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या सल्लागारांनीही तूर्तास थंड बसावे. त्याला क्रिकेटच्या शॉट्सचे धडे देण्याचा मूर्खपणा करू नये. परिस्थितीच त्याला कसे खेळायचे ते शिकवेल. सध्या त्याच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटा.

यशस्वीवर अन्याय होतोय…

ती क्रिकेटमध्ये खेळू शकतो असा फलंदाज म्हणजे यशस्वी जैसवाल. तो कसोटी गाजवतोय. तो टी-20 तही तितक्याच स्फोटक आहे. विराटनंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा सर्वमान्य फलंदाज म्हणजे यशस्वी. पण निवड समिती या युवा खेळाडूवर अन्याय करतेय. त्याला वारंवार संघाबाहेर का बसवलं जात आहे, हेच कळत नाहीय. गिलला डावललं तेव्हा त्याच्या जागी यशस्वीची निवड अपेक्षित होती. पण त्याला कोणत्याही चुकीशिवाय संघाबाहेर केले गेले. त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करायला हवे, असा प्रश्नही वेंगसरकरांनी निवड समितीला केलेय. निवड समितीची अशीच वागणूक मिळत राहिली तर यशस्वी जैसवालचे मनोधैर्य खचू शकते. एखाद्या गुणवान खेळाडूला तो अमूक एका फॉरमॅटसाठीच असल्याचे त्याच्या मनावर बिंबवले तर ते त्याच्यासाठी घातक ठरू शकते, असेही वेंगसरकर म्हणाले.

Comments are closed.