T20WC2026: बांगलादेशच्या नादात पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त करू नका; माजी क्रिकेटपटूंचा पीसीबीला इशारा
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) विनंती केली आहे की टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाक टीमने नक्कीच खेळावे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या नादात पाकिस्तान क्रिकेटला विनाशाकडे नेले जाऊ शकत नाही. पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaaz Sharif) यांच्या भेटीनंतरही पाकिस्तानच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. नकवी यांनी सांगितले की शुक्रवार किंवा पुढच्या आठवड्यात सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
पाकिस्तानचा माजी कसोटी कर्णधार मोहम्मद हफीजने PCB ला विनंती केली आहे की, त्यांनी पाकिस्तान टीमला वर्ल्ड कप खेळण्यासाठी नक्की पाठवावे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष खालिद महमूद आणि बोर्डाचे माजी सचिव आरिफ अली अब्बासी यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. अब्बासी म्हणाले की, बांगलादेशला पाठिंबा देण्याचा निर्णय समजण्यासारखा आहे, पण त्याचा वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याशी काय संबंध? अब्बासी म्हणाले, श्रीलंकेसोबतच्या संबंधांचे काय? साहजिकच पाकिस्तान न खेळल्यास श्रीलंकेचे नुकसान होईल, कारण पाक टीमचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित केले जाणार आहेत.
दुसरीकडे खालिद महमूद यांनीही म्हटले की, पीसीबीने पाकिस्तान क्रिकेटवर अधिक लक्ष दिले पाहिजे.
पाकिस्तानचा माजी कसोटी फलंदाज आणि चीफ सिलेक्टर राहिलेल्या मोहसीन खानने म्हटले की, जरी भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नसले, तरी पाक टीम आधीच आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. मोहसीन खानने विचारले की अशा परिस्थितीत नेमक्या कोणत्या आधारावर PCB टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे? असे करणे पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले ठरणार नाही.
त्यांच्याव्यतिरिक्त पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कर्णधार राहिलेले इंजमाम उल हक आणि मोहम्मद यूसुफ यांनीही म्हटले आहे की PCB ने खूप विचारपूर्वकच कोणताही मोठा निर्णय घ्यावा. या सर्व लोकांचे म्हणणे आहे की पाकिस्तानने बांगलादेशच्या आधी आपल्या क्रिकेटपटूंच्या हिताचा विचार केला पाहिजे.
Comments are closed.