IND vs ENG: ‘बुमराहला विश्रांतीची गरज नाही’ माजी भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी टीम इंडियाला दिला खास सल्ला
इंग्लंड दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जबरदस्त कामगिरी करत आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले असून त्यापैकी बुमराह फक्त दोनच सामने खेळला आहे. कारण मालिकेच्या सुरुवातीलाच त्याने स्पष्ट केलं होतं की, तो आपल्या फिटनेसचा विचार करून 5 कसोटींपैकी फक्त तीनच सामने खेळेल.
चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरु होणार आहे आणि भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण भारत सध्या मालिकेत 1-2 ने मागे आहे. त्यामुळे बुमराहने चौथ्या सामन्यात खेळणे भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil kumble) यांनी मत मांडलं की, बुमराहने हा सामना खेळायलाच हवा. त्यांनी सांगितलं, मी निश्चितपणे बुमराहला पुढचा सामना खेळायला सांगेन कारण हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर तो खेळला नाही आणि भारत सामना हरला, तर मालिका संपेल. बुमराहने दोन्ही उर्वरित सामने खेळायला हवेत. हो, त्याने आधी तीन सामने खेळणार असल्याचं सांगितलं होतं, पण त्यानंतर त्याला मोठा ब्रेक मिळेल. जर त्याला विश्रांती हवी असेल, तर त्याने घरच्या मालिकेतून विश्रांती घ्यावी. पण आत्ता त्याने हे दोन्ही सामने खेळलेच पाहिजेत.
दुसरीकडे, भारताचे सहायक प्रशिक्षक रेयान टेन डोएशेट यांनी बुमराहच्या उपलब्धतेबाबत स्पष्ट केलं की, नाही, हा निर्णय आम्ही मँचेस्टरमध्येच घेऊ. आम्हाला माहीत आहे की त्याला शेवटच्या दोन कसोटींमधून एका सामन्यासाठी संघात ठेवले आहे. आता मालिका महत्वाच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे त्याला खेळवण्याची शक्यता जास्त आहे. पण बुमराह चौथा सामना खेळतो का नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
बुमराहने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. एकूण दोन कसोटीत त्याने आतापर्यंत 12 विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.