पाकिस्तानला शस्त्रे विकू नका!

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला आपण शस्त्रे पुरवू नका, असा आग्रह भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी नेदरलंडस्चे संरक्षणमंत्री रुबेन ब्रेकलमान्स यांच्याकडे केला आहे. पाकिस्तान हा देश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा पोषक देश आहे. त्याचे बळ वाढविल्यास ते एकप्रकारे दहशतवादाचे बळ वाढविल्यासारखे आहे. त्यामुळे पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाला पोसण्याचे धोरण सोडत नाही, तोपर्यंत पाश्चात्य देशांनी पाकिस्तान बळकट होईल, अशा प्रकारची कोणतीही कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करु नये, अशी भारताची इच्छा असल्याचे राजनाथसिंग यांनी नेदरलंडस्च्या संरक्षणमंत्र्यांकडे स्पष्ट केले आहे.

भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी जम्मू-काश्मीरमध्ये आणि इतरत्र अनेक दशकांपासून दोन हात करीत आहे. त्यामुळे भारताचे मित्र असणाऱ्या देशांनी भारताला हिताला बाधा पोहचणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यांनी पाकिस्तानला कोणतीही शस्त्रे, शस्त्रयंत्रणा, शस्त्रतंत्रज्ञान आणि शस्त्रे बनविण्याची साधनसामग्री पुरवू नये. पाकिस्तानच्या दुर्बळ प्रशासनाच्या हाती ही शस्त्रे किंवा तंत्रज्ञान सुरक्षित राहणार नाही. ही शस्त्रे आणि तंत्रज्ञान पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या हाती पडल्यास साऱ्या जगासमोर धोका निर्माण होऊ शकतो, अशा अर्थाचे प्रतिपादन राजनाथसिंग यांनी ब्रेकलमान्स यांच्याकडे केल्याची माहिती देण्यात आली.

नेदरलंडस्चा पुरवठा

नेदरलंडस् हा देश पाकिस्तानला सुरुंग निकामी करणाऱ्या दोन यंत्रणा पुरवित आहे. हा देश पाकिस्तानला सागरी युद्धनौकाही विकत आहे. शस्त्रांच्या क्षेत्रात अनेक डच कंपन्या पाकिस्तानशी संपर्क साधून आहेत. या देशाकडून पाकिस्तानला 1,900 टन वजनाच्या बहुउद्देशीय समुद्री नौकाही दिल्या जाणार आहेत, अशी माहिती भारताला मिळाली आहे. भारताने या शस्त्रपुरवठ्यावर आक्षेप घेतला आहे.

शीख फुटीरतावादाचाही मुद्दा

काही युरोपियन देशांमध्ये शीख फुटीरतावादाला आश्रय मिळत आहे. त्यावरही भारताने आक्षेप घेतला असून या देशांकडे विचारणा केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनाही राजनाथसिंग यांनी या संबंधात भारताची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेत काही शीख फुटीरतावादी आहेत. त्यांच्यावर ट्रंप प्रशासनाने कारवाई करावी, असे भारताने गॅबार्ड यांच्या माध्यमातून अमेरिकेला सुचविले आहे. कोणत्याही देशाने कोणत्याही कारणास्तव दहशतवादाला, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ नये, अशी भाराताची भूमिका अनेक दशकांपूर्वीच भारताने जगासमोर स्पष्ट केले आहे.

Comments are closed.