Health Tips: ‘भाताने वजन वाढत नाही…’ जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक काय म्हणाल्या

वजन कमी करण्यासाठी अनेकजण सर्वात आधी जे टाळतात ते म्हणजे ‘भात’. काहीजण तर भाताच्या नावानेही घाबरतात. मात्र, आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी भाताविषयी पसरलेल्या गैरसमजांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. (dose rice increase weight information in marathi)

‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. प्रणिता म्हणाल्या, भात खाल्ल्याने वजन वाढत नाही उलट तो शरीरासाठी पोषक ठरू शकतो. माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं तरी चालेल. भाताने वजन वाढत नाही. प्रश्न आहे तो ‘कसा’ आणि ‘किती’ खातो याचा.”

त्या पुढे सांगतात की, आपल्या पारंपरिक जेवणात भाताला नेहमी स्थान दिलं जातं. लहानपणापासून भात हे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग राहिला आहे. भातामुळे लठ्ठपणा येतो, हे फक्त अपप्रचार आहे. प्रत्यक्षात, भात आणि डाळ एकत्र खाल्ल्यास संपूर्ण अमिनो अ‍ॅसिड प्रोफाइल तयार होते, जे शरीराच्या प्रोटीन गरजांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

डॉ. प्रणिता सांगतात, ‘भात आणि डाळ यामध्ये स्वतंत्रपणे काही अमिनो अ‍ॅसिड्स कमी असतात. पण दोघांना एकत्र खाल्ल्यास एकमेकांची कमतरता भरून निघते आणि एक संपूर्ण प्रोटीन स्त्रोत तयार होतो.’ त्यामुळेच त्यांनी सल्ला दिला की, भात टाळण्याऐवजी तो योग्य प्रमाणात, योग्य वेळेला खाल्ला पाहिजे. वजन वाढीचे कारण भात नसून, आहारातील असंतुलन, प्रमाणाचा अभाव आणि एकूणच अस्वस्थ जीवनशैली हे असते.

आज अनेकजण वजन कमी करताना अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवतात, विशेषतः भातासारख्या आपल्या पारंपरिक जेवणापासून. यामुळे आहार म्हणजे काही रॉकेट सायन्स नव्हे तर ते नीट समजून आकलनात आणलं तर शरीर निरोगी राहील असं डॉ. प्रणिता अशोक यांचं स्पष्ट मत आहे.

Comments are closed.