जगभरात लोकशाही समाजवादी पक्षांच्या तत्त्वहीन तडजोडींमुळे अति-उजव्यांचे फावले, डॉ. अशोक ढवळे यांचे प्रतिपादन

अनेक देशांमधील लोकशाही समाजवादी पक्ष राजकीय-वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असून त्यांच्या तत्त्वहीन तडजोडींमुळे अति-उजव्या विचारांचे फावले आहे, अशा शब्दांत भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी डाव्या विचारांच्या पक्षांना सुनावले.

16 मार्चला लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान देण्याची संधी डॉ. ढवळे यांना लाभली. त्या वेळी ते बोलत हेते. 17 मार्च 1883 रोजी फ्रेडरिक एंगेल्स यांनी त्यांचे सर्वात जवळचे कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या समाधी स्थळी, लंडनमधील हायगेट स्मशानभूमीत ऐतिहासिक भाषण दिले होते. त्यानिमित्ताने मार्क्स यांचे कार्य आणि प्रासंगिकतेवर दरवर्षी व्याख्यान आयोजित केले जाते. त्याकरिता डॉ. ढवळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी मार्क्स मेमोरियल लायब्ररीच्या सचिव प्रा. मेरी डेव्हिस, क्युबाचे ब्रिटनमधील राजदूत इस्मारा वर्गास वॉल्टर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ ब्रिटनचे सरचिटणीस रॉबर्ट ग्रिफिथ्स आदींसह चीन, व्हिएतनाम, लाओस, व्हेनेझुएला, श्रीलंका येथील दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अनेक देशांमध्ये उजव्या विचारांकडे जनता झुकते आहे. त्यामुळे वांशिक, धार्मिक अल्पसंख्याकांना विरोध केला जातो. विरोधाभास म्हणजे अडॉल्फ हिटलरच्या धोरणाची आज बेंजामीन नेतान्याहू आणि इतरांकडूनही नक्कल केली जात आहे, याकडे ढवळे यांनी लक्ष वेधले.

मध्ये महिन्यात कामगारशेतकऱ्यांचा संप

या परिस्थितीमुळे सर्वच देशांमध्ये संघर्ष आणि प्रतिकार वाढत आहेत.  भारतात लाखो शेतकऱ्यांनी संघर्ष केला. त्यामुळे सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागले. आता कामगारांच्या विरोधात चार नवे कायदे केंद्र सरकार आणू पाहत आहे. त्याविरोधात येत्या मे महिन्यात कामगार वर्गाचा एक विशाल संयुक्त देशव्यापी सार्वत्रिक संप करणार आहोत. याला शेतकऱ्यांचेही समर्थन असेल, असे ढवळे यांनी सांगितले.

Comments are closed.