मुंबईकरांनो, खबरदारी घ्यायलाच हवी, डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला

कोविडचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. पण पूर्वीपेक्षा आताचा कोविड विषाणू तितकासा तीव्र नक्कीच नसावा. तरीही काळजी घ्यायलाच हवी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायलाच हवा, असा सल्ला कोविड महामारीच्या काळात टास्क फोर्समध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले तज्ञ डॉ. अविनाश सुपे यांनी दिला आहे. डॉ. सुपे यांच्याशी केलेली बातचित.

कोविड पुन्हा आलाय, महापालिकेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत?

रुग्ण सापडत असले तर कोविड वेगाने पसरू नये म्हणून गाईडलाईन्स जारी केल्या असतील. प्रतिबंधात्मक उपाय करावेच लागतात. तसे 2021-2022 मध्येही कोविडचा विषाणू स्वरुप बदलून आला होता. पण त्याच्यामुळे पूर्वीइतकी हानी झाली नाही.

जेव्हा तो कोव्हिड -19 कोव्हिड -1 सह समाप्त होतो तेव्हा हे कसे होते?

2019 मध्ये पहिल्यांदाच आलेला कोविड विषाणू भयंकर होता. कारण त्याच्याबद्दल कुणालाच माहिती नव्हती. दीड वर्ष आपण त्याची तीव्रता अनुभवली. लॉकडाऊन केल्यामुळे आपण त्यामुळे होणारे बहुतांश मृत्यू टाळू शकलो होतो. आता सिंगापूर, हाँगकाँगमध्ये रुग्ण सापडत आहेत. पण आताचा कोविड विषाणू तितकासा तीव्र नसेल.

साथ पसरली तर आरोग्य यंत्रणा पुरेशी आहे का?

निश्चितच. आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर्स, कर्मचारी आता कोविडचा सामना कसा करावा याबद्दल प्रशिक्षित आहेत. त्यामुळे साथ पसरली तरी रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी आवश्यक यंत्रणा वेगाने उभी करण्यास फारसा त्रास होणार नाही.

प्रतिबंधक लस अजूनही परिणामकारक ठरेल का?

सर्वांनीच कोविड प्रतिबंधक लस घेतलेली आहे. लसीचा परिणाम दोन वर्षे तरी असतोच. पण दोन वर्षांपूर्वी लस घेतली म्हणून घाबरण्याचे कारण नाही. कारण ज्या शत्रूला रोखण्यासाठी आपण लस घेतली तो आता क्षीण झालेला आहे. अर्थात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमधील विषाणूची तीव्रता जाणून घ्यावी लागेल. पण आता त्या शत्रूचा हल्ला परतावून लावण्याइतके आपण सक्षमही झालो आहोत हे लक्षात घ्या.

कोविडची लागण टाळण्यासाठी काय सल्ला द्याल?

घाबरून न जाता काळजी घ्यावी हाच सल्ला. सर्दी, खोकला, घसादुखी झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून घाला. रोजची कामे करत रहा. नियमित व्यायाम करा.

कोविड विषाणू आता क्षीण झाला आहे. तो पुन्हा आला असला तरी तितकेसे नुकसान करू शकणार नाही. तो वेगाने पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करावेच लागतील. घाबरण्याचे कारण नाही. कोविडला परतावून लावण्याइतकी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.

Comments are closed.