विशेष – चिरदाह स्त्री वेदनेचा!

>> डॉ.गीताली व्ही.एम.

`बळी तीच दोषी’ या पुरुषप्रधान राजकारणाविरुद्धचा स्त्रीचा संघर्ष सध्या अशोक खरात प्रकरणामुळे दिसत आहे. यात शोषण झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत समाजाचा दुटप्पीपणाच अधोरेखित होत आहे.

`नमेची येतो मग पावसाळा!’ या उक्तीप्रमाणे भोंदूबाबांनी केलेले कारनामे महाराष्ट्रात उघड होत असल्याचं दुःखद चित्र दिसत आहे.जागतिक स्तरावर भयावह असणाऱ्या एपस्टीन फाईल्सचा अशोक खरात याचा स्थानिक अवतार आढाळपाळ स्वरूपात समोर आला आणि अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या भोंदूबाबाने गरीबांच्या जमिनी हडप केल्या, प्राण्यांचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला तसंच या क्रूरकर्म्याने स्त्रियांचं लैंगिक शोषण करण्यासाठी जे काही विकृत मार्ग अवलंबले ते वाचून मन सुन्न झालं. असे पुरुष महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहेत. त्यांच्या मानसिकतेचा खोलात जाऊन अभ्यास करणं आणि ती मानसिकता बदलून त्यांना माणूस बनवण्यासाठी काम करणं हे आता लांब  पल्ल्याचा कार्पाम म्हणून अग्रामानं व्हायलाच हवं. नुसती मलमपट्टी उपयोगाची नाही, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना हवी. कारण अशा काही घटना घडल्या की, नराधमाला भररस्त्यात फाशी द्या, लिंग विच्छेद करा इ. इ. अमानुष शिक्षा देण्याची आग्रही मागणी होते. निषेध मोर्चे निघतात. काही दिवसांनी वादळ शांत झालं की, मागच्या दारानं  गुन्हेगार मोकाट सुटतात किंवा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना गुन्हेगारांची शिक्षा माफ होते. वाजत गाजत त्यांची हार घालून आरती ओवाळली जाते असेही संतापजनक प्रकार उघडकीस येत असतात. त्याविरुद्ध निषेध, कोर्टात धाव घेऊन दाद मागावी लागते. हे खूप थकवणारं असतं. मग पुन्हा सारं कसं शांत शांत! मात्र बळी पडलेल्या स्त्रियांच्या वेदनेचा चिरदाह तसाच राहतो. हे थांबायलाच हवं. त्यासाठी…

समाज निकोप आणि स्वास्थ्यपूर्ण असण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत रहावे लागतील. त्यासाठी प्रथम या पितृसत्ताक पुरुषप्रधान संस्कृतीत विषमतेवर आधारित घडवल्या जाणाऱ्या बाईपणा, पुरुषपणा आणि इतरपणा यांच्या घट्ट साचेबद्ध प्रतिमांना विरोध करत सगळ्यांनाच माणूसपणा  ही सर्वांसाठीच  एकमेव महत्त्वाची  आदर्श प्रतिमा आहे हे सांगायला हवं. यासाठी स्त्री चळवळ स्त्रियांचं आत्मभान जागवून त्यांना माणूसपणाच्या वाटेवर घेऊन जाणारी चळवळ आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत शिस्नाला माज आणि योनीला लाज असा दुटप्पी विचार आहे. जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात कळीचं स्थान असणाऱ्या लैंगिकतेसंदर्भात बोलायचे नाही असे संकेत तथाकथित सभ्य समाजात असतात. लैंगिक संबंध घाणेरडे काम. त्यामुळे त्याविषयी अळीमिळी गुप चिळी! या गुप्ततेमुळे लैंगिकतेसंदर्भात दांभिक समाज निर्माण होतो हे लक्षात घेऊ या. ज्या लैंगिक संबंधांमधून नवजीवन जन्माला येतं ते संबंध घाणेरडे कसे काय? तसंच मूल जन्माला घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मासिक पाळीमुळे स्त्रीला विटाळ कसा होतो?असे प्रश्न स्त्री चळवळीनं उपस्थित करत स्त्रीला मासिक पाळीत दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीसंदर्भात विरोध केला. तिला त्या वेळी असणाऱ्या धार्मिक कार्पामात सहभागी होण्याच्या मनाईचा निषेध केला.  Happy to Bleed

सारखी आंदोलनं केली. स्त्रीच्या मनात तिच्या स्वतच्या शरीराविषयी पेरली गेलेली लाज, शरमेची भावना कशी चुकीची आहे हे स्त्रियांच्या लक्षात आणून दिलं.

लैंगिक सुख पुरुषांनी घ्यायचं आणि स्त्रीनं ते निमूटपणे द्यायचं हे माणूसपणाचं लक्षण नाही हे अधोरेखित करत लैंगिक सुखाचा अधिकार दोघांनाही आहे असं ठणकावून सांगणारी स्त्री चळवळ आहे. बलात्कार झालेली स्त्री कलंकित आणि बलात्कारी मात्र उजळ माथ्यानं  मोकाट हिंडणार या पुरुषी वृत्तीचा धिक्कार स्त्री चळवळ करते. बलात्कार हा स्त्रीवर झालेला अतिशय गंभीर भावनिक, मानसिक व शारीरिक अपघात आहे. त्यामुळे ती स्त्री अजिबात कलंकित वगैरे होत नाही. हा अतिशय महत्त्वाचा विचार समस्त स्त्री, पुरुष आणि पारलिंगी व्यक्तींनी आपल्या मनात खोलवर रुजवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत.हे लक्षात ठेवून कामाला लागू या. त्यातून आताच्या भोंदूबाबांनी लैंगिक शोषण केलेल्या स्त्रियांना लढण्याचं बळ मिळेल. या व्यवस्थेत लैंगिक शोषणात बळी पडलेल्या स्त्रियांनाच दोषी, कलंकित ठरवण्याची रीत आहे. ती पूर्णपणे मोडीत काढलीच पाहिजे असं तुम्हाला पण वाटतं ना? तर मग अशा महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पुढे येत त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आवश्यक असेल ती सर्व मदत करू या. तिच्या जिव्हारी लागलेल्या या आघाताने ती खचणार नाही यासाठी तिचं, तिच्या नातेवाईकांचं आणि आजूबाजूच्या लोकांचं प्रबोधन करणं अतिशय गरजेचं आहे. या कांडामध्ये बळी पडलेल्या एकल महिलांना संरक्षण, आर्थिक मदत करण्यासाठी सरकारवर संघटितपणे दबाव आणल्यानं काम जलद होईल असं वाटतं.

समाज माध्यमांवर बळी पडलेल्या महिलांचे व्हिडीओ लीक होतात हे अती गंभीर आहे, पण त्याहून लांच्छनास्पद म्हणजे ते काही तथाकथित सभ्य माणसं अपडेट होण्याच्या नावाखाली चवीनं बघतात. यात स्त्रियांची टक्केवारी कमी असते, पण त्या बळी पडलेल्या स्त्रियांच्या संदर्भात किती प्रमाणात संवेदनशील राहून कणखर भूमिका घ्यायला तयार होतात याविषयी जरा शंकाच वाटते आहे.

समाज माध्यमांत होणाऱ्या अर्वाच्य चर्चा, ट्रोलिंग यामुळे महिलांचं आधीच मोठय़ा प्रमाणावर खच्चीकरण केलं जात आहे. फोटो, व्हिडीओ एआयच्या मदतीनं हवे तसे बदलून फेक फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचा उद्योग तेजीत आहे. या सगळ्या कृष्णकृत्यांमुळे बळी पडलेल्या स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या नैराश्याच्या शिकार बनून शिक्षण, नोकरी, कौटुंबिक जीवनात अस्वस्थतेनं वेढल्या जाऊ शकतात. लहानपणी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं सावट आयुष्यभर तिच्या मनात लैंगिक संबंधाविषयी भय, किळस, संताप आदी भावना जागवत ठेवतं. आयुष्यं उद्ध्वस्त करू शकतात. स्त्रीच्या वेदनेचा चिरदाह शमवण्यासाठी लैंगिक संबंध यासंदर्भात स्त्री, पुरुष आणि पारलिंगी व्यक्तींनी निकोप  दृष्टिकोन ठेवण्याची नितांत गरज आहे आणि…दुर्दैवानं स्त्रीवर कधी लैंगिक अत्याचार झालाच तर तिनं खचून न जाता स्वत कलंकित झालो असं न मानता कणखरपणे आत्मसन्मान जपत आपलं आयुष्य आनंदानं पुढे चालू ठेवलं पाहिजे. त्यात तिच्या घरच्यांनी आणि समाजानं तिला साथ दिली पाहिजे.

घरात मुलगा झालाच पाहिजे म्हणून सासू छळते, नवरा मारतो अशी अगतिक झालेली स्त्री बाबाबुवांच्या, ज्योतिष्याच्या मागे जाते. तिथे अत्याचार झाले तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करते. मात्र काही स्त्रिया धाडस दाखवत गुन्हा नोंदवतात तेव्हा जणू त्याच गुह्यात सामील होत्या अशा पद्धतीनं त्यांना बदनाम करत ट्रोल केलं जातं. बळी तीच दोषी या पुरुषप्रधान राजकारणाविरुद्ध संघर्ष करायलाच हवा. हे स्त्री, पुरुष आणि पारलिंगी अशा सर्वांनी एकजूट करून बदलायलाच हवं.

स्त्री चळवळ सांगते, आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे आणि जेव्हा आपण शरीरसंबंधांना `नाही’ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ `नाही म्हणजे नाहीच’ हा असतो हे पुरुषांनी अतिशय पक्कं स्वतच्या मनावर ठसवून ठेवलं पाहिजे. त्या `नाही’ नंतरही बलात्कार झालाच तर त्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करताना आपल्या मनावर त्या संतापजनक घटनेचा विपरीत परिणाम होऊ न देता आपलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी त्या घटनेकडे निर्लेप वृत्तीनं बघत आपलं आयुष्य नव्या उमेदीनं सुरू ठेवलं पाहिजे. हे नक्कीच आपल्या हातात आहे. खरं आहे ना?

[email protected]

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Comments are closed.