आसाम निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नाट्य
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. बोरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले असून यात त्यांनी पक्षनेतृत्वाकडून दुर्लक्षित करण्यात आल्याचा आणि राज्य काँग्रेसमध्ये योग्य स्थान न देण्यात आल्याचा आरोप केला होता. परंतु काँग्रेस नेतृत्वाने याप्रकरणी हस्तक्षेप केल्यावर बोरा यांनी स्वत:चा राजीनामा मागे घेतला आहे.
काँग्रेस नेतृत्वाला सोमवारी सकाळी स्वत:चा राजीनामा पाठविला असून हे पाऊल का उचलावे लागले हे देखील कळविले आहे. हा काही वैयक्तिक निर्णय नाही. मी पक्षाकरता 32 वर्षे काम केले आहे. 1994 मध्ये मी काँग्रेसमध्ये सामील झालो होतो. पक्षाच्या भविष्याच्या चिंतेबद्दल काँग्रेसनेतृत्वाला सर्वकाही विस्तृतपणे सांगितले असल्याचा दावा भूपेन बोरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
2-3 पक्षांकडून ऑफर
निश्चितपणे मी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी मी पुढील काळात विस्तृत भूमिका मांडणार आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांनी मला फोन करत प्रवेशाची ऑफर दिली आहे. यासंबंधी पुढील काळात निर्णय घेणार असल्याचे भूपेन बोरा यांनी सांगितले होते.
आसाम मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
भूपेन बोरा हे आसाम काँग्रेसचे अखेरचे हिंदू नेते हेते, जे आमदार किंवाह मंत्रिपदावर राहिले नव्हते. त्यांचा राजीनामा एक प्रतिकात्मक संदेश देतो की काँग्रेसमध्ये सामान्य परिवाराचा कुठलाही व्यक्ती प्रगती करू शकत नाही. भूपेन बोरा यांच्या राजीनाम्याचे स्वागत करतो. परंतु बोरा यांनी अद्याप आमच्या पक्षात सामील होण्यासाठी संपर्क साधलेला नाही. मंगळवारी मी त्यांच्या घरी जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही भूपेन बोरा यांचे स्वागत करणे आणि त्यांना एक सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी तयार होतो असे वक्तव्य मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे.
2 वेळा आमदार
भूपेन बोरा हे 2021-25 पर्यंत आसाम काँग्रेसचे अध्यक्ष राहिले असून मागील वर्षी त्यांची जागा गौरव गोगोई यांनी घेतली होती. आसाममध्ये बोरा हे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बोरा यांनी स्वत:चा राजीनामा मागे घेतला असला तरीही गौरव गोगोई आणि त्यांच्यामधील राजकीय संघर्ष यामुळे चव्हाट्यावर आला आहे. पुढील काळातही याचे पडसाद आसाम काँग्रेसमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत.
Comments are closed.