द्रविड-अश्विन जोडीचा धमाका! आयपीएलआधीच ‘या’ स्पर्धेत संघ खरेदी करत मारली एन्ट्री

भारतीय टीमचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि आर. अश्विन यांनी मिळून एका नवीन संघात गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘युरोपियन टी-२० प्रीमियर लीग’मध्ये या दोन्ही खेळाडूंनी इतर काही गुंतवणूकदारांसह ‘ग्लासगो’ (Glasgow) हा संघ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आर. अश्विन आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटशी जोडलेला आहे, तर राहुल द्रविड देखील निवृत्तीनंतर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. आता या दोघांनी एक संघ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

​’बीबीसी स्पोर्ट’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, राहुल द्रविड आणि रविचंद्रन अश्विन यांनी एका भारतीय गुंतवणूकदार गटासोबत मिळून युरोपियन टी-२० प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. विशेष म्हणजे ही सहा संघांची स्पर्धा असून याचे आयोजन उन्हाळ्यात केले जाणार आहे. त्यांनी ग्लासगो नावाच्या संघात गुंतवणूक केली आहे. ग्लासगोच्या आधी ॲमस्टरडॅम, बेलफास्ट आणि एडिनबर्ग हे संघ ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या गुंतवणूकदारांनी खरेदी केले होते. स्पर्धेचे आयोजक आता लवकरच नेदरलँड्समधील ‘रॉटरडॅम’ या ठिकाणचा संघही विकण्याच्या प्रयत्नात आहेत.

​केवळ भारतीय क्रिकेटपटूच नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू फाफ डू प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि जोंटी रोड्स हे रॉटरडॅम संघ खरेदी करणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु लवकरच ही बातमी समोर येऊ शकते. ही युरोपियन टी-२० प्रीमियर लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स क्रिकेट बोर्डांकडून संयुक्तपणे आयोजित केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन देखील ‘रूल्स स्पोर्ट्स’ नावाच्या भारतीय कंपनीसह या स्पर्धेच्या मालकांपैकी एक आहे.

​युरोपियन टी-२० प्रीमियर लीगची सुरुवात २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही स्पर्धा २० सप्टेंबरपर्यंत चालेल असे सांगितले जात आहे. इंग्लंडची पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका आणि ही टी-२० स्पर्धा एकाच वेळी समोरासमोर असण्याची शक्यता आहे.

Comments are closed.