BCCI ला तब्बल 119 कोटींचा दणका, Dream11 ला सरकारचा झटका, आशिया कपच्या तोंडावर स्पॉन्सर्स गेल्या
ड्रीम 11 टीम इंडिया प्रायोजकत्व: भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली. याचा थेट परिणाम फॅन्टसी गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी ड्रीम11 (Dream11) वर झाला असून, कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे की ते आता भारतीय संघाचे स्पॉन्सर (Sponsor) राहू शकणार नाही. दुबईत सुरू होणाऱ्या आशिया कपच्या फक्त दोन आठवडे आधी टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. ड्रीम11च्या माघारीमुळे बोर्डाला तब्बल 119 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयला दिली माहिती
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “ड्रीम11च्या प्रतिनिधींनी बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली आणि सीईओ हेमांग अमीन यांना पुढे स्पॉन्सरशिप सुरू ठेवता येणार नसल्याची माहिती दिली. परिणामी, ते आशिया कपसाठी टीमचे स्पॉन्सर राहणार नाहीत. बीसीसीआय लवकरच नवीन टेंडर जारी करेल.”
ड्रीम11वर लागणार का दंड?
बीसीसीआयच्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, ड्रीम11वर कोणताही दंड आकारला जाणार नाही. करारामध्येच एक तरतूद आहे की, जर स्पॉन्सरशिपचा मुख्य व्यवसाय सरकारच्या कायद्यामुळे प्रभावित झाला, तर त्यांना बीसीसीआयला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
तीन वर्षांचा 358 कोटींचा करार
ड्रीम11ची स्थापना सुमारे 18 वर्षांपूर्वी झाली. ब्लूमबर्गच्या मते, ही कंपनी सध्या तब्बल 8 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह भारतातील सर्वात मोठा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. जुलै 2023 मध्ये ड्रीम11ने बीसीसीआयसोबत 3 वर्षांसाठी 358 कोटी रुपयांचा करार केला होता. याआधी हा अधिकार एडटेक कंपनी बायजूजकडे होता.
धोनीपासून रोहितपर्यंत ब्रँड अॅम्बेसेडर
ड्रीम11चा आयपीएलमध्ये देखील मोलाचा वाट आहे. अनेक फ्रँचायझीसोबत त्यांचे करार आहेत. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारखे टॉप क्रिकेटपटू या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर राहिले आहेत. 2020 मध्ये चायनीज कंपनी विवो आयपीएलमधून बाहेर पडल्यावर ड्रीम11ने आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप स्वीकारली होती.
फुटबॉल आणि बास्केटबॉलशीही नाते
ड्रीम11 केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही, तर फुटबॉल आणि बास्केटबॉलशीही त्याचे नाते आहे. भारतातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीगचा तो अधिकृत फँटसी पार्टनर राहिला आहे, मात्र सध्या ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित आहे. 2017 साली एनबीए (National Basketball Association) ने ड्रीम11 प्लॅटफॉर्मवर आपला अधिकृत फँटसी गेम सुरू केला. त्याशिवाय प्रो कबड्डी लीग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ यांच्यासोबतही या ऑनलाइन गेमिंग कंपनीने करार केले आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.