ड्रीम 11 आऊट! 358 कोटींचा करार संपला, आता कार कंपनी टीम इंडियाच्या जर्सीवर रन करणार!
फँटसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम 11 आता भारतीय क्रिकेट संघाची (BCCI) टायटल स्पॉन्सर राहिलेली नाही. बीसीसीआयने नव्या स्पॉन्सरच्या शोधाला सुरुवात केली आहे, पण तो निर्णय पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी होणं कठीण दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, टोयोटासह काही मोठ्या कंपन्या टायटल स्पॉन्सरशिपमध्ये रस दाखवत आहेत. अलिकडेच ऑनलाईन गेमिंग संवर्धन व विनियमन विधेयक 2025 लोकसभा व राज्यसभेत पास होऊन कायद्याच्या रूपात लागू झाले. या कायद्यानुसार प्रत्यक्ष पैशांवर आधारित गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच ड्रीम 11 भारतीय संघाची टायटल स्पॉन्सर राहू शकत नाही.
या प्रकरणी बीसीसीआयचे अधिकारी सैकिया यांनी पीटीआयला सांगितले “नव्या नियमांनंतर ड्रीम 11 किंवा इतर कोणत्याही गेमिंग कंपनीसोबत प्रायोजक करार ठेवता येणार नाही. त्यामुळे आम्ही दुसरे पर्याय शोधत आहोत. प्रक्रिया सुरू आहे. काही निश्चित झाल्यावर माध्यमांना माहिती दिली जाईल.”
ड्रीम 11 ने भारतीय संघाचे टायटल अधिकार सुमारे 44 दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे 358 कोटी रुपये) मध्ये विकत घेतले होते. हा करार 2023 ते 2026 पर्यंत होता. अजून एका वर्षाचा कालावधी शिल्लक असताना कंपनीने टायटल स्पॉन्सर करार रद्द केला.
आयपीएल मध्ये अधिकृत फँटसी स्पोर्ट्स भागीदार म्हणून माय11 सर्कल (My11 Circle) कार्यरत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूएईत होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना होण्यासाठी फक्त 15 दिवस उरले आहेत. त्यामुळे त्यापूर्वी नवीन स्पॉन्सर मिळवणं कठीण आहे. “राष्ट्रीय संघाच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी जाहिरात द्यायची आहे, त्यावर आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून निर्णय घ्यावा लागेल. यात वेळ लागणारच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.