जालन्यात जाफराबाद-चिखली रोडवर कारचा भीषण अपघात; चालकाचा होरपळून मृत्यू
जालन्यातील जाफराबाद-चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. कारला आग लागल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नितीन प्रभाकर गवळी असे मयत तरुणाचे नाव आहे.
नितीन आपल्या अल्टो कारने नाशिकहून अकोल्याकडे जात असताना हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात कळते. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जाफराबाद-चिखली मार्गावरील जंजाळवाडी परिसरात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली.
धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर कारने तत्काळ पेट घेतला. दरम्यान, गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने नितीनला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तो गाडीमध्येच अडकला आणि आगीत होरपळून त्यांचा गाडीतच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक देव पवार, हेड कॉन्स्टेबल अनंता भुतेकर, पोलीस कर्मचारी विजय जाधव, ओम नागरे, अरुण वाघ,चालक राम मोरे यांच्यासह फॉरेन्सिक व वैद्यकीय पथक घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू आहे.
गवळी कुटूंबावर दुःखाचा डोंगर
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तविला असून जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुपचंदनगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments are closed.