मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू
मद्यधुंद डंपर चालकाने पदपथावर गाडी चढवून 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 12 वाजून 50 मिनिटांनी वाघोलीजवळील केसनंद फाटा परिसरात घडली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये चिमुरड्या बहीण-भावाचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. दरम्यान, एक दिवसापूर्वीच अमरावतीहून बिगारी कामाच्या शोधार्थ पुण्यात आल्यानंतर रात्रीचा तिघांचा पदपथावरील मुक्काम शेवटचा ठरला आहे.
विशाल विनोद पवार (22), वैभवी रितेश पवार (1) आणि वैभव रितेश पवार (2, सर्व रा. अमरावती) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नागेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (18), आलिशा विनोद पवार (47) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (26 रा. नांदेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय मूळचे अमरावतीतील असून दरवर्षी शेतीतील कामे उरकल्यानंतर डिसेंबर महिन्यात बिगारी कामासाठी पुण्यात येतात. त्यानंतर केसनंद फाटा परिसरात पदपथावर सर्व कुटुंबीय झोपण्यासाठी आसरा घेतात. रविवारी (दि. 22) रात्री दहाच्या सुमारास पवार कुटुंबीय अमरावतीहून केसनंद फाटा परिसरात आले होते.
जेवण केल्यानंतर ते रस्त्यालगत असलेल्या पदपथावर झोपी गेले. मद्यधुंद डंपरचालकाने पावणेएकच्या सुमारास पदपथावर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. त्यामुळे आरडाओरड, गोंधळ, किंचाळ्यांचा आवाज झाला. एका तरुणासह दोन चिमुरड्यांचा डंपरच्या चाकाखाली सापडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. उर्वरित सहा गंभीर जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व 40 कामगार रविवारी रात्री अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. दरम्यान, या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या, दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना शासनाकडून मदत जाहीर करा, अशा मागण्या करीत नातेवाईकांनी काही वेळ रास्ता रोको केले.
जखमींचा खर्च सरकार करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
अपघात जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार असून मृत्युमुखी पडलेल्यांनाही आर्थिंक मदत करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Comments are closed.