दुबईची खेळपट्टी पाहून टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, प्लेइंग-11 निवडीसाठी 3 मोठे पेच

भारत विरुद्ध युएई एशिया कप खेळपट्टीचा अहवालः आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध यूएई असा सामना रंगणार आहे. भारताने यूएईविरुद्धचा एकमेव टी-20 सामना 2016 साली खेळला होता, ज्यात टीम इंडियाने 9 विकेट्सने सहज विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा सामना सोपा मानला जात असला, तरी खेळपट्टीवरील दाट गवत संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत भर घालत आहे. पहिल्याच सामन्यात किती स्पिनर आणि किती वेगवान गोलंदाज उतरवायचे, हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

दुबईत मिळाली नाही सरावाची संधी

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला नेहमीच गूढ पिच म्हणून ओळखले जाते. कधी फलंदाजांचा धमाका पाहायला मिळतो, तर कधी गोलंदाज सामन्यावर वर्चस्व गाजवतात. विशेष म्हणजे इथे कधी वेगवान गोलंदाजांना, तर कधी फिरकीपटूंना मदत मिळते. पण यंदा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे, कारण भारतीय खेळाडूंना इथे सरावाची परवानगीच मिळाली नाही. टीम इंडिया गेल्या आठवड्यापासून आयसीसी अकॅडमीमध्ये सराव करत होती. प्रत्यक्ष सामन्यापूर्वी फक्त एक दिवस आधीच खेळाडूंना पिच पाहायला मिळाले. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मोर्कल यांनीही मान्य केले की पिचवर गवत आहे आणि त्यामुळे संघ निवडीचं डोकेदुखी वाढली आहे.

संजू सॅमसन की जितेश शर्मा?

आजच्या सामन्यात विकेटकीपर कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. संजू सॅमसन की जितेश शर्मा? ज्याला आज संधी मिळेल, त्याच्यावर पुढील सामन्यांमध्येही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे संजूला खालच्या क्रमात फलंदाजी करावी लागेल. दरम्यान, संजूच्या तुलनेत जितेशने जास्त विकेटकीपिंग सराव केला आहे, त्यामुळे संजूला बाकावर बसवले जाण्याचीही शक्यता आहे.

सर्वात मोठा पेच म्हणजे क्रमांक आठची जागा

भारतीय संघासाठी सर्वात मोठा पेच म्हणजे क्रमांक आठची जागा आहे. या स्थानासाठी शिवम दुबेचा विचार केला जातोय, जो नेट्सवर गोलंदाजीही करत आहे. जसप्रीत बुमराहसोबत अर्शदीप सिंग किंवा हर्षित राणा यांना उतरवले, तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका हार्दिक पांड्या आपल्या 4 षटकांतून निभावू शकतो. शिवाय, अभिषेक शर्मा याला गेल्या काही सामन्यांमध्ये सहावा गोलंदाज म्हणून आजमावलं जात आहे. मोर्कल म्हणाले, “संघात ऑलराउंडर असल्यानं कर्णधाराला पर्याय वाढतात, म्हणूनच आम्ही सर्व कॉम्बिनेशनची टेस्ट करत आहोत.”

भारतीय संघ आजचा सामना यूएईविरुद्ध खेळताना पुढील पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीचा विचार करणार आहे. एकदा योग्य कॉम्बिनेशन ठरवल्यानंतर बदल होण्याची शक्यता कमी आहे. मोर्कल याने स्पष्ट केले, “आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. सामना सुरू होण्याच्या दिवशी परिस्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडे प्रत्येक परिस्थितीत योग्य पर्याय असावेत, हीच आमची मुख्य भूमिका आहे.”

आणखी वाचा

Comments are closed.