हार्दिकच्या शॉटने भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त, सुपर-8च्या आधी सरावादरम्यान मोठी घटना

आजपासून (२१ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत. यामध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असल्याने गतविजेत्याने तयारीला सुरूवात केली आहे. भारताने साखळी फेरीनंतर एका दिवसाचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर संघाने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सराव केला. यामध्ये सर्वांच्या नजरा अभिषेक शर्मावर होत्या, त्यानंतर सर्व लक्ष मोहम्मह सिराजने वेधले. त्याला कारण हार्दिक पांड्या बनला. हार्दिकच्या एका शॉटने सिराज जखमी झाला.

भारताचा सुपर-८चा पहिला सामना रविवारी (२२ फेब्रुवारी) अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर सराव करत होते. काही फलंदाज नेटमध्ये सराव करत असताना हार्दिकने एक शॉट खेळला. तो शॉट इतका जलद होता की सिराजच्या गुडघ्याला लागला. त्यानंतर लगेच सिराज मैदानावर बसला, तेव्हा सर्व खेळाडू त्याच्याकडे पळाले.

सिराजची स्थिती पाहून मेडिकल स्टाफही आला. फिजिओने त्याच्या गुडघ्यावर उपचार केले. चांगली गोष्ट म्हणजे सिराजची दुखापत एवढी गंभीर नाही. तो लगेच उठून उभा राहिला. याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशनला दुखापत झाली होती. तेव्हा ईशानची दुखापतही गंभीर नव्हती आणि तो लवकरच ठिक झाला होता.

सिराज काही वेळानंतर पुन्हा सरावाला आला. त्याची दुखापत थोडी दुखत असल्याचे त्याच्या हावभावावरून जाणवले, मात्र काळजी करण्याचे कारण नाही. त्याला भारताच्या अंतिम अकरामध्ये कमीच संधी असून वेळ पडली तर तोपर्यंत तो लवकरच फिट होईल.

तसेच सिराज या टी२० विश्वचषकाच्या यूएसएविरुद्धच्या सामन्यात बुमराहच्या जागी खेळला होता. तेव्हा त्याने ४ षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. नंतरच्या तिन्ही साखळी सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसावे लागले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत वेगवान गोलंदाजीमध्ये बुमराहसोबत अर्शदीप सिंगला संधी देण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनेही त्यांचे सर्व साखळी सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

तसेच हे दोन संघ मागील टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा मात्र भारताने बाजी मारली होती, आताही दोन्ही संघ तुलनेने सारखेच असून यामध्ये कोणाचे पारडे जड हे सामन्याच्या दिवशीच कळेल.

Comments are closed.