परतीच्या पावसाने शेती पाण्यातच, रायगडात गावरान कडधान्य महागणार

ओल्या दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी संकटात आहे. आता रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती असून गावरान कडधान्य महागणार आहेत. परतीचा पाऊस लांबल्यामुळे शेत शिवारांमध्ये पाणी तुंबले आहे. परिणामी जमिनीची मशागत करण्यात अडचणी येत असून कडधान्य लागवड खोळंबली आहे. याचा रायगड जिल्ह्यातील 12 ते 15 हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साधारण बारा ते पंधरा हजार हेक्टरवर वाल, मूग, मटकी, तूर, चवळी ही कडधान्य घेतली जातात. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी कडधान्याचे पीक घेतो. मात्र लांबलेल्या पावसामुळे अद्याप खरिपातील भातपीक काढणी पूर्ण झालेली नाही. भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साठले असल्यामुळे शेतकऱ्यांना कडधान्य पिकासाठी मशागत करणे आणि कडधान्याची लागवड करणे शक्य नाही. पावसाळी वातावरणामुळे कडधान्य पिकास पूरक हवामान नाही. एकूणच दुहेरी संकटामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
भात शेतीचे नुकसान तर झालेच मात्र आता कडधान्य पिकालादेखील फटका बसला आहे. शेतीचे एक शास्त्र असते. त्यानुसार प्रत्येक हंगाम सांभाळावा लागतो. हंगामानुसार पीक घेतले तरच चांगले उत्पादन मिळते. मात्र लांबलेल्या परतीच्या पावसामुळे आता कडधान्य पिकाचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
शरद गोळे, अध्यक्ष, कृषी मित्र संघटना.

Comments are closed.