केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोसायट्यांचे आवार बनले डम्पिंग; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घनकचरा संकलन करण्यासाठी सुमित एल्कोप्लास्ट या ठेकेदाराला दहा वर्षांसाठी ८५ कोटींचे कंत्राट दिले आहे. असे असतानाही ठेकेदाराला त्रास नको म्हणून केडीएमसीने आठवड्यातून एकदाच कचरा उचलण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारात कचऱ्याचे ढीग साचून डम्पिंग ग्राऊंड तयार झाले आहे. त्यामुळे तातडीने महापालिकेने आठवड्यातून एकदा कचरा उचलण्याचा आदेश रद्द करावा आणि रोजच्या रोज कचरा संकलित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पालिका आयुक्तांना दिला आहे.

पालिकेच्या आदेशानुसार सोमवारी प्लॅस्टीक बॉटल , मंगळवारी कापड, बुधवारी कागद व पुठ्ठा, गुरुवारी प्लॅस्टिक भंगार, शुक्रवारी थर्माकोल, रबर, शनिवारी काचेच्या वस्तू व रविवारी कागद, पुठ्ठा अशा प्रकारे आठवड्यातील या दिवशी नमूद केलेला कचराच संकलन केला जाणार आहे. या आदेशामुळे वर्गीकरण केलेला विविध प्रकारचा कचरा संकलित केल्यास प्रत्येक सोसायटीत डम्पिंग ग्राऊंड तयार होणार आहे. तसेच आठवडाभर कचरा साठवून ठेवल्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याची समस्या तयार होणार आहे. ठेकेदाराला ठेका दिला असतानाही सोसायट्यांनी सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आठवडाभर करायचे आहे. हे पालिकेचे धोरण कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी दिला आहे.

Comments are closed.