आधी विहीर खोदली, नंतर परवानगी घेतली ! माजलगाव धरण क्षेत्रात जिलेटिनचे स्फोट
नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी विहीर तर खोदलीच, त्यासाठी जिलेटिनचे शक्तिशाली स्फोटही घडवून आणले. प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच विहीर खोदल्यानंतर परवानगी घेतली ! या प्रकरणी धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला म्हणून जलसंपदा विभागाच्या तक्रारीवरून चक्क अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरातीमागून घोडे नाचवत नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
माजलगाव शहराला १०० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत पूरक पाणीपुरवठा योजना सुरू असून सदरील योजना वादग्रस्त ठरत असताना माजलगाव नगरपालिकेने माजलगाव धरणात विहिरी खोदकामासाठी उपविभागीय अभियंता यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता परळी यांना परवानगी मागितली. मात्र मागणी परिपूर्ण नसल्याने नगरपालिकेला माजलगाव धरणात विहीर खोदकामासाठी परवानगी देण्यात आली नाही. असे असतानाही संतोष कण्ट्रक्शन यांनी विनापरवाना मोठमोठे जिलेटीनचे अधिक क्षमतेचे स्फोट घेऊन विहिरीचे खोदकाम केले. पाणी पुरवठ्याची विहीर धरणाच्या भिंतीपासून काही फर्लांग अंतरावर आहे. जिलेटिनच्या स्फोटामुळे धरणाच्या भिंतीलाच धोका निर्माण झाला.
पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या संतोष कन्स्ट्रक्शनने विनापरवानगी धरण प्रतिबंधित क्षेत्रात जिलेटिनचे शक्तिशाली स्फोट घडवून आणले. एवढा गंभीर प्रकार घडूनही जलसंपदा विभाग गाढ झोपेत होता. याचाच गैरफायदा घेऊन कंत्राटदाराने राजकीय वजन वापरून विहिर खोदल्यानंतर विहीर खोदण्याची परवानगी घेण्याचा चमत्कार करून दाखवला. जलसंपदा विभागाच्या धरण व्यवस्थापन अधिकारी तथा अभियंता श्रेणी – १ शीतल माने यांनी जिलेटिन स्फोट प्रकरणात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिलेटिनचा स्फोट कुणी घडवून आणला, हे माहिती असतानाही पोलिसांनी चक्क अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केले आहे.
- पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा माजोरडेपणा
- धरण प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
Comments are closed.