आघाडीमुळे मध्य विभाग उपांत्य फेरीत

बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्य विभागाने पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला, मात्र हिंदुस्थानी फिरकीपटू कुलदीप यादवला एकही बळी घेता आला नाही ही संघासाठी निराशाजनक बाब ठरली.
उत्तर-पूर्व विभागाने विजयासाठी मिळालेल्या 679 धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना संयम आणि जिद्दीची फलंदाजी साकारली. चौथ्या व शेवटच्या दिवशी त्यांनी सहा गडी राखून 200 धावा काढत सामना अनिर्णित राखला.
मध्य विभागाने पहिल्या डावात चार विकेट गमावून 532 धावा ठोकल्या होत्या आणि प्रतिस्पर्ध्यांना फक्त 185 धावांत गुंडाळले. त्यानंतर तिसऱया दिवशी त्यांनी दुसरा डाव सात बाद 331 अशा सुस्थितीत घोषित केला होता.
विजय अशक्य असल्याचे लक्षात घेऊन उत्तर-पूर्व विभागाने पराभव टाळण्यावर भर दिला. कर्णधार रोंगसेन जोनाथन (60 धावा) आणि यष्टिरक्षक जेहू अँडरसन (64 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भक्कम भागीदारी करत मध्य विभागाच्या गोलंदाजांची कसोटी पाहिली. अँडरसनने 11 चौकार व 1 षटकार लगावला तर अनुभवी जोनाथनने नऊ चौकार मारले.
शेवटच्या क्षणी फिरोजिम जोतिन (नाबाद 9) आणि अंकुर मलिक (नाबाद 5) यांनी खात्रीशीर बचाव केला. मध्य विभागासाठी हर्ष दुबे, आदित्य ठाकरे व शुभम शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले.
दरम्यान, संघातील मुख्य गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात 20 आणि दुसऱया डावात 12 षटक टाकूनही एकही गडी टिपला नाही, त्यामुळे त्याला निराशा ओढवली. अखेर मध्य विभागाला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरी गाठता आली, तर उत्तर-पूर्व विभागाने पराभव टाळण्यात यश मिळवले.
Comments are closed.