‘रॉन्ग साईड’ने प्रवास नडला; भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारला घोडबंदर रोडवर अपघात, चुकीच्या लेनमधून गाडी टाकल्याचे उघड

भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना रॉन्ग साईडने प्रवास करणे अंगाशी आले आहे. ठाण्याहून पालघरच्या दिशेने जात असताना चुकीच्या लेनमधून गाडी टाकल्याने समोरून येणाऱ्या डंपरने सावरा यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. शुक्रवारी सकाळी घोडबंदर रोडवर नायगाव येथे हा अपघात झाला. या अपघातातून सुदैवाने खासदार डॉ. हेमंत सावरा बचावले असले तरी त्यांच्या चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार प्रवासावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नियम, कायदे फक्त सर्वसामान्यांनाच लागू होतात का? असा सवाल समाज माध्यमांवर विचारला जात आहे.

खासदार डॉ. हेमंत सावरा हे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ठाण्याहून पालघरच्या दिशेने जात होते. वर्सोवा खाडी पूल ओलांडल्यानंतर गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी होती. ही कोंडी टाळून शॉर्टकट मारण्याच्या नादात खासदारांच्या चालकाने गाडी थेट मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर घातली. याच वेळी समोरून येणाऱ्या डंपरने खासदारांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग्स तातडीने उघडल्या गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. खासदार डॉ हेमंत सावरा यांना किरकोळ दुखापत झाली असून त्याचा कारचालक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चुकीच्या लेन गाडी नेल्याची कबुली

दरम्यान, अपघातानंतर स्वतः खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ट्रॅफिकमुळे आम्ही गाडी चुकीच्या लेनमधून नेत होतो. डंपर चालकाला समोरून चुकीच्या पद्धतीने येणारी गाडी न दिसल्याने ही धडक बसली, अशी कबुली त्यांनी दिली.

व्हीआयपी संस्कृती कधी थांबणार?

महामार्गावर ‘रॉन्ग साईड’ने वाहन चालवणे हा गुन्हा असून यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातात. सामान्य माणसाने असा नियम मोडला तर पोलीस तत्काळ दंड वसूल करतात. मग खासदारांना ट्रॅफिक टाळण्यासाठी नियम धाब्यावर बसवण्याची सवलत कुणी दिली? वेळेवर पोहोचण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे एका जबाबदार लोकप्रतिनिधीला शोभते का? व्हीआयपी संस्कृतीमुळे नियम मोडण्याची सवय कधी थांबणार? असा सवाल समाज माध्यमावर विचारला जात आहे.

Comments are closed.