रंगयात्रा – द नाईट वॉच
>> दुष्यंत पाटील
मिलिशियाचे नागरिक शहरासाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. या पथकाची आठवण म्हणून मोठी समूहचित्रं काढून घेतली जात. महान डच चित्रकार रेम्ब्रॉ याने 1642 मध्ये अशाच एका पथकाचं चित्र चितारले. ती प्रसिद्ध कलाकृती म्हणजे `द नाईट वॉच’ हे चित्र पाहण्यासाठी अॅमस्टरडॅममध्ये आजही लोक गर्दी करताना दिसतात.
17 व्या शतकात नेदरलँड्स जगातल्या सर्वात वैभवशाली व्यापारी देशांपैकी एक होता. हा काळ इतिहासामध्ये `डच गोल्डन एज’ अशा नावानंही ओळखला जातो. या काळात नेदरलँड्समध्ये व्यापार, उद्योग, विज्ञान आणि कला यामध्ये मोठी भरभराट झाली. अॅमस्टरडॅम, हार्लेम, लेडन यांसारखी शहरं आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होती. या शहरांमध्ये श्रीमंत व्यापारी आणि नागरिकांची परिषद प्रशासन चालवायची. यामुळे शहरांनी स्वतची सुरक्षा स्वतच सांभाळणं स्वाभाविक होतं. त्या काळात डच नगरपालिकांना कायमस्वरूपी सैन्य ठेवणं परवडायचं नाही. म्हणून शहरांनी स्थानिक नागरिकांवर आधारित अशी सुरक्षा व्यवस्था तयार केली. ही व्यवस्था म्हणजे `मिलिशिया.’
मिलिशिया म्हणजे शहरातल्या नागरिकांनी तयार केलेले स्वयंसेवी पथक असायचं. त्यात मुख्यत्वे शहरातले व्यापारी, दुकानदार, श्रीमंत नागरिक असायचे. हे लोक पूर्णवेळ सैनिक नसत. गरज पडल्यावर ते शहराचे रक्षण करण्यासाठीही तयार असायचे. मिलिशियाच्या कामांमध्ये रात्री गस्त घालणं, शहरातली शिस्त राखणं, मोठय़ा कार्पामांमध्ये व्यवस्था राखणं, आग किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदत करणं अशा गोष्टींचा समावेश असायचा. मिलिशियामध्ये काम करणाऱया स्वयंसेवकांना शहरामध्ये खास प्रतिष्ठा असायची.
मिलिशियाचे सदस्य आपली आठवण म्हणून मोठी समूहचित्रं काढून घ्यायचे. या चित्रांमध्ये प्रत्येक सदस्य दिसावा अशी अपेक्षा असायची. प्रत्येकानं चित्रासाठी काही रक्कम दिलेली असायची. अशाच एका पथकाचं चित्र म्हणजे प्रसिद्ध कलाकृती `द नाईट वॉच’ हे चित्र महान डच चित्रकार रेम्ब्रॉ यानं 1642 मध्ये रंगवलं.
1642 साली मिलिशियाच्या एका पथकानं आपलं समूहचित्र काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे काम रेम्ब्रॉकडे दिलं. या मिलिशियाच्या पथकाचा प्रमुख होता कॅप्टन फ्रान्स बॅनिंग कॉक. खरं तर त्या काळातली समूहचित्रं खूप साधी असत. अशा चित्रांमध्ये सर्व लोक एका रांगेत बसलेले किंवा उभे असायचे. प्रत्येकाचा चेहरा नीट दिसावा, एवढीच अपेक्षा असायची. पण रेम्ब्रॉनं `द नाईट वॉच’मध्ये एक नवीनच प्रयोग केला.
हे समूहचित्र काढताना रेम्ब्रॉनं पारंपरिक पद्धत वापरली नाही. त्यानं स्थिर पोझ देऊन उभ्या असलेल्या लोकांचं चित्र काढलं नाही. त्याऐवजी त्यानं जिवंतपणा असणारं, लोकांची हालचाल दाखवणारं दृश्य रंगवलं. चित्र पाहताना असं वाटतं की, जणू काही पथक आता मार्च सुरू करणार आहे. चित्रात काही लोक पुढे चालत आहेत, काही शस्त्रs तयार करत आहेत, काही ढोल वाजवत आहेत. वातावरण एखाद्या नाटकामधल्या क्षणासारखे आहे. त्यामुळे ही कलाकृती केवळ `ग्रुप फोटो’ नाही, तर कथा सांगणारं चित्र आहे.
रेम्ब्रॉनं काढलेल्या चित्राकडे पाहिलं की, आपल्याला पहिल्याच नजरेत चित्रातल्या लोकांची हालचाल, शस्त्रं, ढोल, ध्वज दिसतात. चित्रातला प्रकाश आणि सावल्या आपलं लक्ष वेधून घेतात. या चित्रात दोन व्यक्तींवर विशेष प्रकाश पडतो. यातला पहिला म्हणजे काळ्या कपडय़ांमधला कॅप्टन फ्रान्स बॅनिंग कॉक. आणि दुसरा म्हणजे पिवळ्या पोषाखातला त्याचा सहकारी लेफ्टनंट रूयटेनबर्ग. चित्रामध्ये त्यांच्यावर प्रकाश पडतो आणि त्यामुळे आपलं लक्ष आपोआप त्यांच्याकडे जातं. यालाच चित्रकलेत `फोकस’ म्हणतात. चित्रामध्ये जिवंतपणा आलाय तो चित्रातल्या लोकांच्या हालचालीमुळे. चित्रातल्या दृश्यात कुणी बंदूक तयार करतंय, तर कुणी ढोल वाजवतंय. काही लोक पुढे जाताना दिसतात. चित्रात एक छोटी मुलगी आहे. काही तज्ञांच्या मते ती त्या मिलिशिया पथकाचे प्रतीक आहे. तिच्या कमरेला कोंबडीचे पंजे लटकलेले दिसतात. काही लोकांच्या मते, हे पंजे त्या मिलिशिया पथकाच्या चिन्हाशी संबंधित असू शकतात.
`द नाईट वॉच’ हे चित्र इतकं प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे त्यातला जिवंतपणा. ते फक्त लोक उभे असलेले चित्र नाही, ते एक क्षण पकडतं. त्यात नाटक आहे, हालचाल आहे, प्रकाश आहे, रहस्य आहे. अॅमस्टरडॅममध्ये हे चित्र पाहण्यासाठी आजही लोक गर्दी करताना दिसतात.
Comments are closed.