रंग यात्रा – बोटिंग पार्टीचे जेवण
>> दुष्यंत पाटील
[email protected]
आनंदाचे क्षण जतन करण्याचा प्रयत्न करणारे ‘लंचन ऑफ द बोटिंग पार्टी’ हे मानवी नातेसंबंध व निखळ आनंदावर आधारलेले अजरामर चित्र. आजच्या क्लिकच्या जगाप्रमाणे हे क्षण कॅनव्हासवर रेखाटले आहे जगप्रसिद्ध फ्रेंच चित्रकार पियरे-ऑगस्ट रेन्वा याने.
कल्पना करा शनिवार किंवा रविवारची एक आल्हाददायक दुपार आहे. आपण आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या हिल स्टेशनला किंवा कोकणामध्ये समुद्रकिनाऱयावर गेलोय. आपण एखाद्या छान हॉटेलमध्ये गेलोय आणि तिथे समोर मोकळ्या हवेत टेबलवर खाण्यापिण्याच्या वस्तू सजलेल्या आहेत. गरमागरम पदार्थांचा वास दरवळतोय, वारा हलकंच आपल्या चेहऱयाला स्पर्श करून जातोय. एका कोपऱयात कुणीतरी गिटारच्या तारा छेडतंय, काही लोक गप्पांमध्ये रममाण झालेत. कुणीतरी उत्स्फूर्त विनोद करून इतरांना हसवतंय, तर कुणीतरी एखाद्या कुत्र्याशी खेळण्यात दंग आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ, तणावरहित आनंद पसरलाय.
आजच्या काळात अशाप्रसंगी आपण पटकन मोबाईल घेतो आणि फोटो घेऊन असे आनंदाचे क्षण जतन करायचे प्रयत्न करतो. जवळपास 140 वर्षांपूर्वी असेच आनंदाचे क्षण जतन करण्याचा प्रयत्न एका फ्रेंच चित्रकारानं केला. तेव्हा अर्थातच मोबाईल नव्हता. त्यानं हे क्षण कॅनव्हासवर टिपले. त्या चित्राचं नाव आहे ‘लंचन ऑफ द बोटिंग पार्टी’ . हे चित्र रेखाटलं आहे जगप्रसिद्ध फ्रेंच चित्रकार पियरे-ऑगस्ट रेन्वा यानं.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. अनेक ठिकाणी रेल्वे धावायला लागल्या होत्या. शहरांचा विस्तार होत होता आणि लोकांचं जीवनमान बदलत होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कामगारांना आणि मध्यमवर्गीयांना आता ‘वीकेंड’ म्हणजेच आठवडय़ाची सुट्टी मिळू लागली होती. पॅरिसच्या गजबजलेल्या, धूर आणि गर्दीनं भरलेल्या शहरातून बाहेर पडून लोक रविवारी पॅरिसबाहेर वाहणाऱया सीन नदीच्या काठावर फिरायला जाऊ लागले. तिथे बोटिंग करणं, मित्रांसोबत खाणं, पिणं आणि नदीकाठच्या छोटय़ा रेस्टॉरंट्समध्ये गाणी गात नाचणं ही त्या काळातली ‘लेटेस्ट फॅशन’ बनली होती. हे चित्र ज्या ठिकाणी रेखाटलं गेलंय, ते ठिकाण म्हणजे सीन नदीच्या काठावर असलेलं ‘मेसन फुरनेज’ नावाचं रेस्टॉरंट.
रेन्वानं काढलेलं चित्र ‘इम्प्रेशनिस्ट’ शैलीत होतं. ‘इम्प्रेशनिझम’ ही 19 व्या शतकात फ्रान्समध्ये सुरू झालेली चित्रकलेची एक खास शैली होती. या शैलीत कलाकार चित्रातल्या बारीक तपशीलांपेक्षा प्रकाश आणि रंगांचं बदलणारं रूप टिपण्यावर जास्त भर द्यायचे. हे चित्रकार निसर्गाचं थेट निरीक्षण करण्यासाठी बहुतेक वेळा मोकळ्या हवेत जाऊन चित्र काढायचे. या चित्रांचं मुख्य वैशिष्टय़ म्हणजे यातले छोटे, जलद आणि ठळक ब्रशचे फटके. कॅनव्हासवर रंग एकमेकांत पूर्ण न मिसळता त्यांचे छोटे ठिपके दिले जायचे. यामुळे चित्राला एक वेगळीच चमक मिळायची. पारंपरिक चित्रांमधल्या गडद, गंभीर रंगांऐवजी यातले रंग अतिशय पांढरे, तेजस्वी आणि जिवंत वाटायचे. इम्प्रेशनिस्ट चित्रकारांना या शैलीतून काही महत्वाचे परिणाम साधायचे होते. ते आपण पुढच्या एखाद्या लेखात पाहूच. या शैलीमध्ये प्रामुख्यानं रोजचं सामान्य जीवन, निसर्गचित्रं आणि बागेत किंवा कॅफेमध्ये बसलेली माणसं अशी साधी चित्रं रेखाटली गेली. क्लॉड मोने आणि ऑगस्ट रेन्वा हे या चळवळीतले प्रमुख चित्रकार. ‘लंचन ऑफ द बोटिंग पार्टी’ हे या शैलीतलं एक गाजलेलं चित्र.
या चित्रात डाव्या बाजूला कुत्र्याशी खेळणारी तरुणी ही रेन्वाची प्रेयसी होती. नंतर त्यांचं लग्न झालं. डाव्या बाजूला उभा असणारा तरुण म्हणजे रेस्टॉरंट मालकाचा मुलगा. याशिवाय चित्रामध्ये रेन्वाचा जवळचा मित्र असणारा एक श्रीमंत, प्रसिद्ध चित्रकार, प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री, माजी सैन्याधिकारी, फूल विक्रेती, कवी, सरकारी अधिकारी हे लोकही आहेत. खरे तर या काळात युरोपियन समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यात प्रचंड मोठी दरी होती. उच्चभ्रू लोक गरीब लोकांसोबत बसणं टाळायचे, पण या चित्रात समाजातल्या सर्व थरातले लोक दिसताहेत. आनंद, मैत्री आणि निसर्गाचा आस्वाद घेताना समाजातल्या भिंती आपोआपच तुटतात, असं या चित्रातून जाणवतं. दुपारचं जेवण आणि वाईन यांनी सगळ्यांना एकाच पातळीवर आणलंय! हे चित्र पाहून आपल्याला आपल्या कॉलेजच्या कट्टय़ाची किंवा मित्रांच्या गेट-टुगेदरची आठवण येते. या चित्राचा गाभा मानवी नातेसंबंध आणि निखळ आनंदावर आधारलेला आहे. त्यामुळेच हे चित्र अजरामर झालं.
Comments are closed.