भावेश-विजय गिरीचा जेतेपदाचा चौकार

दादा खानोलकरच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क जिमखाना (एसपीजी) आयोजित नवव्या अखिल हिंदुस्थानी मार्कर्स आणि सहाय्यक प्रशिक्षक दुहेरी टेनिस स्पर्धेत मुंबईच्या भावेश नवलू आणि विजय गिरी जोडीने चक्क सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी हैदराबादच्या दिलीप आणि किरण जोडीचा  6-1 असा सहज पराभव करीत या स्पर्धेत आपलीच हवा असल्याचे दाखवून दिले.

लहान-थोरांना टेनिसचे मार्गदर्शन करणाऱ्या मार्कर्स आणि सहायक प्रशिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसपीजीच्या टेनिस विभागाच्या संजय पटेल आणि योगेश परुळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणार्या या स्पर्धेला संजीव खानोलकर आणि एसपीजीच्या व्यवस्थापकीय समितीचा पाठिंबा लाभल्यामुळे सलग नवव्या वर्षीही दिमाखदार आयोजन करण्यात आले. नऊ वर्षांपूर्वी 40 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या स्पर्धेचा लौकिक मार्कर्सची विम्बल्डन असा झाल्यामुळे यंदा हिंदुस्थानातील 240 मार्कर्सने सहभाग नोंदविला आणि ही स्पर्धा दोन दिवस अत्यंत चुरशीच्या लढतींमुळे संस्मरणीय झाली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुरस्कर्ते आणि सिक्युरिटी एचक्यूचे व्यवस्थापकीय संचालक संकेत खानोलकर आणि एसपीजीचे टेनिस सचिव योगेश परुळकेर यांच्या हस्ते  पार पडला. याप्रसंगी एसपीजीचे सरटिचणीस संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, विश्वस्त लता देसाई आणि प्रकाश नायक हेसुद्धा उपस्थित होते.

Comments are closed.