भारतीय महिला क्रिकेटपटूंना किती मिळतं मानधन? पुरुषांपेक्षा कमी की जास्त?

भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकताच संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला आहे. या ऐतिहासिक विजयाने महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आता या खेळाडूंवर अपेक्षांचा भार अधिक आहे, पण त्याचबरोबर चाहत्यांचे प्रेम आणि सन्मानही अधिक वाढले आहे. गेल्या दोन दशकांत महिला क्रिकेटने मोठी झेप घेतली आहे, आणि या विजयाने भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले आहे.

पूर्वीच्या काळात महिला क्रिकेटरना ना योग्य मानधन मिळत असे, ना चांगल्या सुविधा. 2006 पूर्वी महिला क्रिकेट ‘वुमन क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया’कडून चालवले जात होते, पण बीसीसीआयमध्ये विलीन झाल्यानंतर परिस्थिती बदलली. आता पुरुष आणि महिला क्रिकेटरना टेस्टसाठी 15 लाख, वनडे साठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख रूपये असे समान मॅच फी दिली जाते . मात्र, वार्षिक करार रकमेच्या बाबतीत अजूनही फरक आहे. पुरुष खेळाडूंना 7 कोटींपर्यंत मिळते, तर महिला खेळाडूंना जास्तीत जास्त 50 लाख.

सुविधांच्या दृष्टीनेही महिला क्रिकेटर अजूनही मागे आहेत. पुरुष संघाला आधुनिक ट्रेनिंग, रिहॅब, फिजिओ आणि मेंटल हेल्थ कोचिंग मिळते; तर महिला संघासाठी हे प्रयत्न अजून मर्यादित आहेत. विमानप्रवासात आणि निवासात मात्र आता समानता येत आहे. महिला खेळाडूंनाही बिझनेस क्लास आणि पाचतारांकित हॉटेलची सुविधा मिळू लागली आहे. तरीही दैनंदिन प्रशिक्षण आणि वैद्यकीय सहाय्याच्या बाबतीत अधिक गरज आहे.

वीमन्स प्रीमियर लीग सुरू झाल्यामुळे महिला खेळाडूंना नव्या संधी मिळाल्या आहेत. त्यांची सॅलरी आता 10 लाख ते 3.4 कोटी दरम्यान असते. पण ब्रँड एंडोर्समेंट्स आणि स्पॉन्सरशिप्समध्ये अजूनही मोठा फरक आहे. बीसीसीआयच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकात महिला क्रिकेटसाठी केवळ 1% खर्च झाला. पण आता या विजयामुळे महिला क्रिकेटची किंमत, मान आणि ओळख नव्या उंचीवर जाणार आहे. हा फक्त विजय नाही, हा समानतेच्या दिशेने भारताच्या क्रिकेट संस्कृतीचा नवा अध्याय आहे.

Comments are closed.