बांगलादेशी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या! अध्यक्षांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले..
बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी ‘बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशन’ने एक पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की, जोपर्यंत बीसीबीचे संचालक नजमुल इस्लाम यांना त्यांच्या पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत कोणताही खेळाडू क्रिकेट खेळणार नाही. या वादामुळे BPL 2026 चा पहिला सामना रद्द करावा लागला. अखेर बीसीबीला त्यांच्या संचालकांना पदावरून हटवावे लागले, मात्र त्यानंतर संतप्त समर्थकांनी ढाका येथील स्टेडियमबाहेर तोडफोड केली.
आता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे की, त्यांना आणि इतर खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
बीसीसीबी संचालक नजमुल इस्लाम यांनी अनुभवी खेळाडू तमीम इक्बालला ‘इंडियन एजंट’ म्हटले होते. या विधानामुळे सर्व खेळाडू प्रचंड संतापले होते. खेळाडूंच्या तीव्र विरोधामुळे बोर्डाला नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवावे लागले, त्यानंतर खेळाडूंनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. क्रिकबझशी बोलताना मोहम्मद मिथुन म्हणाले, सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या तशा झाल्या नाहीत. पण क्रिकेटचे नुकसान होऊ नये आणि खेळाडूंचा विचार करून आम्हाला काही बाबतीत तडजोड करावी लागली. सुरुवातीला आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो, पण जर आम्ही हटलो नसतो तर सामनेच झाले नसते. त्यामुळे आम्हाला थोडे नमते घ्यावे लागले.
धमक्यांबाबत विचारले असता मिथुन यांनी सांगितले, हे खरं आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असा अनुभव येत आहे. मी कधीही देशाच्या विरोधात बोललो नाही, तरीही मला लक्ष्य केले जात आहे. मला अनोळखी नंबरवरून सतत फोन येत आहेत, त्यामुळे मी आता फोन उचलणे बंद केले आहे. पण व्हॉट्सॲपवर येणारे मेसेज आणि व्हॉईस नोट्स मी थांबवू शकत नाही. मिथुन यांनी पुढे सांगितले की, केवळ मलाच नाही, तर इतर अनेक खेळाडूंनाही वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. माझे नाव असोसिएशनशी जोडलेले असल्याने माझा नंबर सार्वजनिक झाला आहे, त्यामुळे मला जास्त त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल मी अजून बोर्डाशी अधिकृतपणे बोललो नाहीये. बांगलादेश क्रिकेटमधील या वादामुळे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) हस्तक्षेप करणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
Comments are closed.