पाक क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्ड कपच्या मध्यातच प्रशिक्षकावरून राडा; काय आहे नेमकं प्रकरण?

२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली. संघ सुपर ८ फेरीतूनच बाहेर पडला. पाकिस्तानला उपांत्य फेरी (सेमीफायनल) गाठता आली नाही. टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, आता समोर आलेल्या एका नवीन मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानचे खेळाडू आता मुख्य प्रशिक्षकांवर नाराज आहेत.

​मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे खेळाडू मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यावर खुश नाहीत. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, स्पर्धेदरम्यान अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी प्रशिक्षकांच्या वर्तणुकीबद्दल तक्रार करण्यासाठी वैयक्तिकरित्या पीसीबी (PCB) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.

​सूत्रांच्या दाव्यानुसार, प्रशिक्षकांचा कठोर स्वभाव आणि कोणाशीही सल्लामसलत न करता घेतलेल्या निर्णयामुळे ड्रेसिंग रूममध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. वरिष्ठ अधिकारी सध्या संघासोबतच्या त्यांच्या वर्तणुकीचा आढावा घेत आहेत आणि प्रशिक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यापूर्वी दौऱ्याच्या अहवालाची (टूर रिपोर्ट) तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांचा असा दावा आहे की, निवड समिती आणि कर्णधार सलमान अली आगा हे दोघेही हेसन यांच्या अधिकाराला आव्हान देण्यास असमर्थ होते आणि संघात प्रशिक्षकांचे पूर्ण वर्चस्व होते.

​पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानची ही पहिलीच मालिका असेल. पाकिस्तानने या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. पहिला सामना ११ मार्च रोजी, दुसरा सामना १३ मार्च रोजी, तर तिसरा सामना १५ मार्च रोजी खेळवला जाईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

Comments are closed.