EBay मध्ये पुन्हा नोकरकपात; १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, कारण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म ईबेने (EBay) आपल्या १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी इयानोन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेमोमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनी आपल्या एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ९ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार असून, व्यवसायातील गुंतागुंत कमी करणे आणि वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

या वर्षी फेब्रुवारीतही ईबेने ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी नोकरकपात आहे. सध्या कंपनी प्रमाणित लक्झरी वस्तू आणि रिफर्बिश्ड उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. ज्या ग्राहकांना दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्यात रस असतो, अशा वर्गाला आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

कंपनीची रणनीती योग्य दिशेने काम करत असल्याचे सीईओ जेमी इयानोन यांनी मेमोमध्ये म्हटले आहे. भविष्यातील मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी कुठे लक्ष केंद्रित करायचे आणि कुठे गुंतवणूक करायची, याबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यातून असे दिसून येते की, कंपनी नोकरकपातीला आपल्या सध्याच्या धोरणातील बदल न मानता, संसाधनांचे योग्य नियोजन मानत आहे. ईबेच्या प्रवक्त्यानेही या नियोजित नोकरकपातीला दुजोरा दिला असून, बाधित कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत याबाबत सूचना मिळतील असे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीच्या अखेरीस दोन टप्प्यांतील नोकरकपातीपूर्वी कंपनीत १२,३०० कर्मचारी कार्यरत होते.

Comments are closed.