अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राविरुद्ध मोठी कारवाई, ED चे मुंबई आणि इंदूरमधील 6 ठिकाणी छापे

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्ध सुरू असलेल्या फेमा चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात छापे टाकले. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ला ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील किमान सहा आणि इंदूरमधील महू येथील किमान सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.

टीव्ही९ भारतवर्षच्या वृत्तानुसार, हे छापे परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपावरून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्ध सुरू असलेल्या परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) चौकशीचा एक भाग आहे.

दरम्यान, ईडी याआधीही अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसह (आर इन्फ्रा) अनेक समूह कंपन्यांनी केलेल्या १७,००० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमितता आणि सामूहिक कर्ज ‘डाइव्हर्शन’ची चौकशी करत आहे. ज्यात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) गुन्हेगारी तरतुदींचा समावेश आहे.

पीएमएलए अंतर्गत ईडीची कारवाई सेबीच्या अहवालानंतर सुरु झाली आहे. ज्यामध्ये आर इन्फ्राने सीएलई नावाच्या कंपनीमार्फत इंटर-कॉर्पोरेट डिपॉझिट्सच्या (आयसीडी) स्वरूपात बेकायदेशीर निधी रिलायन्स ग्रुप कंपन्यांमध्ये वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Comments are closed.