ईडी कॅनडातील महाविद्यालयांची चौकशी करत आहे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडातून भारतीय नागरीकांना अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने स्थलांतरित करण्याच्या कामात कॅनडातील काही महाविद्यालयांचा हात आहे, अशी माहिती प्रवर्तन निदेशालयाला (ईडी) मिळाल्याने ही संस्था या महाविद्यालयांची चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे कॅनडातील काही भारतीय संस्थांची चौकशीही याच कारणासाठी केली जात आहे, अशी माहिती बुधवारी ईडीकडून देण्यात आली आहे.
गुजरातच्या दिनगुचा खेड्यातील एका चार जणांच्या कुटुंबाचा कॅनडातून अमेरिकेत पायी जाताना थंडीत काकडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर ईडीने या चौकशीचा प्रारंभ केला आहे. अमेरिकेत बेकायदा स्थलांतरीत होऊ इच्छिणारे भारतीय नागरीक प्रथम कॅनडाला जातात. तेथील काही महाविद्यालये आणि काही संस्था यांच्या साहाय्याने हे नागरीक, विशेषत: तरुण विद्यार्थी अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. असे प्रयत्न करताना अनेकजण पकडले जातात, तर काहीजण मृत्यूमुखी पडतात. गुजरातचे हे चार जणांचे कुटुंब कडाक्याच्या थंडीत कॅनडाहून अमेरिकेला पायी चालले होते. मात्र, शून्य अंशाखालच्या तापमानाची थंडी त्यांना सहन झाली नाही. त्यामुळे या कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची दोन अपत्ये यांचा मृत्यू झाला होता.
कॅनडातून बेकायदा स्थलांतर
कॅनडामध्ये अनेक संस्था असून त्या कॅनडात आलेल्या लोकांना अमेरिकेत स्थलांतरीत करण्याचे बेकायदा काम करतात. कॅनडातील काही महाविद्यालयेही याच कामामध्ये गुंतलेली आहेत. या संस्थांना आणि महाविद्यालयांना यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. बेकायदा स्थलांतर हा त्यांचा धंदाच झाला आहे. अमेरिकेच्या दक्षिणेला असणाऱ्या मेक्सिको सीमारेषेवरुन अमेरिकेत प्रवेश करणे आता अवघड झाल्याने अमेरिकेच्या उत्तरेला असणाऱ्या कॅनडामधून हे बेकायदा स्थलांतर घडत आहे. अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अशा बेकायदा स्थलांतरासंबंधी कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतानेही या संकेतांची नोंद घेऊन बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
भावेश पटेलविरोधात कारवाई
गुजरातमधील कुटुंबाच्या मृत्यूनंतर ईडीने कॅनडास्थित भावेश पटेल या स्थलांतर व्यावसायिकाच्या विरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. त्याच्या विरोधात एफआयआर गुजरात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अनेक भारतीय तरुण कॅनडाचा विद्यार्थी व्हिसा मिळवितात. मात्र, कॅनडात गेल्यानंतर ते विद्यापीठांमध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश न घेता बेकायदेशीरपणे अमेरिकेची सीमारेषा ओलांडून त्या देशात जातात, असे ईडीच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ईडीनेही आता आपल्या कारवाईचा वेग वाढविला असल्याचे दिसत आहे.
55 ते 60 लाख रुपयांचा खर्च
अशा प्रकारे कॅनडातून बेकायदा पद्धतीने अमेरिकेत जाण्यासाठी कॅनडातील संस्था 55 ते 60 लाख रुपये घेतात अशी माहितीही ईडीला प्राप्त झाली आहे. एवढा पैसा खर्च करुनही अमेरिकेत प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते. कारण कॅनडातून अमेरिकेला जाण्यासाठी दोनशे ते तीनशे किलोमीटरचे अंतर कित्येकदा पायी चालत पार करावे लागते. ते केल्यानंतरही अमेरिकेच्या सीमेवर पकडले जाण्याची शक्यता असते. तरीही हा धोका अनेकांकडून पत्करला जातो.
Comments are closed.