‘गुजरात समाचार’च्या मुंबई ऑफिसवर छापा, ईडीची कारवाई सुरूच

गुजरात समाचारविरुद्धची ईडीची कारवाई सुरूच असून आता या वृत्तपत्र समूहाच्या मुंबईतील कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. ईडीने आज गुजरात समाचारच्या मुंबईतील कार्यालयावर छापा टाकला. उशिरापर्यंत या कार्यालयाची झडती सुरू होती.

‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रश्न विचारल्याच्या रागातून गुजरात समाचारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. ईडीने गुजरात समाचारच्या गुजरात येथील कार्यालयात छापेमारी केली. 36 तास ही झडती चालली. त्यानंतर वर्तमानपत्राचे मालक बाहुबली शाह यांना अटक करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली असून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. गुजरात समाचार सातत्याने सरकारच्या चुकांवर बोट ठेवत होता. त्यातूनच सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला गेला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे हे आणखी एक कारस्थान असल्याची तोफ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डागली होती.

बाहुबली शाह यांना अंतरिम जामीन

बाहुबली शाह यांना विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर शाह यांची प्रकृती खालावली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. 73 वर्षीय शाह यांना आरोग्याच्या कारणास्तव हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे, असे नमूद करत न्यायालयाने त्यांच्या नियमित जामिनावरील सुनावणी 31 मे 2025 पर्यंत तहकूब केली.

शाह यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा

शाह यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. त्यांच्या प्रकृतीची माहिती दररोज न्यायालयाल द्या, असे आदेश विशेष न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तपासात सहकार्य असेही न्यायालयाने शाह यांना सांगितले आहे. शाह यांच्या आरोग्याचा विचार करुनच आम्ही अंतरिम जामीनाला विरोध केला नाही, असे ईडीने स्पष्ट केले.

कारवाईबाबत ईडीचे अजूनही मौन

20 वर्षांपूर्वीच्या व्यवहाराचे एक प्रकरण उकरुन काढत ईडीने ही कारवाई केली. या कारवाईनंतर ईडीने या वर्तमानपत्राच्या मुंबईतील कार्यालयाकडे मोर्चा वळवला. ही झडती सुरूच असून या संपूर्ण कारवाईबाबत ईडीकडून अद्याप कोणताही अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही. तसेच बाहुबली शाह यांना नेमकी अटक का करण्यात आली त्याचे कारणही अजून दिलेले नाही. त्यामुळे ईडीच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Comments are closed.