ईडीने दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्ये छापे टाकले.

4 कोटींची रोकड, 6 किलो सोने, 313 किलो चांदी जप्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील तरुणांना डंकी रुटने अमेरिकेत पाठवल्याच्या प्रकरणात शुक्रवारी ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये ईडीने 4 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, 300 किलोहून अधिक चांदी आणि सहा किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली.

दिल्लीसह पंजाब (जालंधर) आणि हरियाणा (पानिपत) येथील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटच्या मालमत्तांवर छापे टाकत 4.62 कोटी रुपये रोख, 313 किलो चांदी आणि 6 किलो सोन्याची बिस्किटे जप्त केल्याचा दावा केला आहे. छाप्यादरम्यान जप्त केलेल्या फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तपासकर्त्यांनी काही गुन्हेगारी चॅट्स देखील आढळून आली आहेत. हरियाणातील एका प्रमुख आरोपीच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून ‘डंकी’ व्यवसायाशी संबंधित रेकॉर्ड आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एजंट त्यांच्या कमिशनसाठी हमी म्हणून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवास करणाऱ्या लोकांच्या मालमत्तेची कागदपत्रे ठेवत असल्याची आढळून आले आहे. सदर व्यक्तींना दक्षिण अमेरिकन देशांमधून धोकादायक मार्गांनी पाठवताना सीमा ओलांडण्यास आणि बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या सर्व व्यवहारादरम्यान संबंधित व्यक्तींना संपूर्ण प्रवासात छळण्यात आले, जास्त पैसे वसूल करण्यात आले आणि बेकायदेशीर कामे करण्यास भाग पाडण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे.

Comments are closed.