महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील एड छापा

750 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूक प्रकरणात कारवाई

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जीएसटी फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने झारखंड तसेच पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी ही कारवाई केली. ईडीने या प्रकरणात यापूर्वीही एकदा छापे टाकले होते. यावेळी विश्वसनीय माहितीच्या आधारे कारवाई केली जात असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. 750 कोटी रुपयांच्या ‘बनावट’ जीएसटी पावत्या बनवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) किमान 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. ईडीच्या पथकांनी झारखंडमध्ये सर्वाधिक 8 ठिकाणी छापे टाकले. हे प्रकरण झारखंडमध्ये बनावट कंपन्यांद्वारे 750 कोटी रुपयांच्या ‘बनावट’ इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) तयार करण्याशी संबंधित आहे.

या प्रकरणाचा तपास त्याचा ‘मुख्य सूत्रधार’ शिवकुमार देवदाच्या अटकेपासून सुरू झाला. त्याला मे 2025 मध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेची टीम छापे टाकण्यासाठी राजधानी रांची आणि जमशेदपूरमध्ये पोहोचली होती. या छाप्यानंतर बंद दरवाजाआड तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान घरात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास आणि आत असलेल्या लोकांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील सॉल्ट लेक आणि अलिपूरमध्येही ईडीची कारवाई सुरू होती.  तर महाराष्ट्रातही 2 ठिकाणी ईडीची कारवाई सुरू आहे. सीएपीएफ जवानही ईडी टीमसोबत कार्यरत होते. सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Comments are closed.