चंगूर बाबांच्या रूपांतरण केंद्रांवर एड छापा

14 केंद्रे लक्ष्य, महत्वपूर्ण असे अनेक पुरावे हस्तगत

वृत्तसंस्था/लखनौ

हजारो हिंदू महिलांना मुस्लीम करण्याचे कारस्थान रचणाऱ्या जमालुद्दीन ऊर्फ छंगूरबाबा याच्या 14 धर्मांतरण केंद्रांवर प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) धाडी टाकल्या आहेत. जमालुद्दीन याला हिंदू महिलांचे धर्मांतर करण्यासाठी विदेशांमधून शेकडो कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे, असा आरोप असून आता हे प्रकरण ईडीने तपासासाठी हाती घेतले आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून 1 हजारांहून अधिक हिंदू महिलांचे धर्मांतर त्याने केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील बलरामपूर जिल्हा हा या बाबाच्या बेकायदेशीर कृत्यांचे केंद्र होता. या जिल्ह्यात बारा स्थानी ईडीने धाडी घातल्या आहेत. तसेच मुंबईतही दोन स्थानी छापे टाकण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळपासूनच ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या धाडसत्राला प्रारंभ केला होता. संध्याकाळपर्यंत या चौदा स्थानांची झाडाझडती करण्यात येत होती. या धाडींमध्ये अनेक महत्वाचे पुरावे आणि कागदपत्र हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनेक भूखंड केले हडप

जमालुद्दीन याने हिंदू महिलांचे धर्मांतरण करण्यासाठी विदेशांमधून शेकडो कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळविले होते. या पैशातून त्याने उत्तर प्रदेशात आणि इतर अनेक स्थानी मालमत्ता आणि भूखंड खरेदी केले आहेत. तसेच त्याच्याकडे अलिशान कार्स आणि इतर उपभोगाच्या अनेक वस्तूंचा भरण आहे, अशी माहिती  ईडीला मिळाली होती. त्यामुळे त्याच्या अनेक स्थानांवर एकाच वेळी व्यापक धाडी घातल्या गेल्या आहेत. त्याच्याकडे अनेक भूखंडांची खरेदी पत्रे आणि इतर कागदपत्रे, रोख रक्कम, प्रक्षोभक साहित्य आणि इतर वस्तू सापडल्या. त्याची पुढची चौकशी केली जात आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

दहशतवादविरोधी दलाकडून अटक

जमालुद्दीन याला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी दलाने यापूर्वीच अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. त्याची महिला सहकारी नितू ऊर्फ नसरीन हिलाही अटक करण्यात आली आहे. त्याने नितू हिचेही धर्मांतर काही वर्षांपूर्वी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील हिंदूंची संख्या कमी करणे आणि मुस्लिमांची संख्या वाढविणे, हा या धर्मांतराच्या कारस्थानाचा हेतू आहे, असे बोलले जाते.

आतल्या वर्तुळात ईडीचा प्रवेश

जमालुद्दीन याचे जाळे भेदण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आता या बाबाच्या नजीकच्या लोकांची आणि सहकाऱ्यांची चौकशी चालविली आहे. त्याचे हस्तक, दलाल, नजीकचे अनुयायी, सहकारी, त्याच्या बेकायदेशीर मालमत्तांचे व्यवस्थापक, त्याला पाठिंबा आणि संरक्षण देणारे नेते यांची सूची ईडीने बनविली असून त्यांची कसून चौकशी करण्याचा आदेश ईडीने अधिकाऱ्यांना दिला आहे.

बँक खात्यांची तपासणी

या बाबाची आणि त्याच्या सहकाऱ्यांची असंख्य बँक खाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडीने या बँक खात्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे. विदेशी बँकांमध्येही त्यांची खाती आहेत. या खात्यांमधील रकमेचा संबंध त्याच्या धर्मांतराच्या रॅकेटशी आहे काय, याचीही चौकशी ईडीकडून केली जात आहे.

प्रचंड अवैध संपत्ती उघड

या बाबाकडे 106 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. ही संपत्ती 40 बँक खात्यांमध्ये ठेवण्यात आली असून याच पैशातून गरीब हिंदू महिलांना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याची योजना बाबाने चालविली होती, असा आरोप आहे. या बँक खात्यांशिवाय बाबाकडे अनेक स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. ही सर्व संपत्ती आता ईडी जप्त करणार आहे. जमालुद्दिन हा मूळचा उत्तर प्रदेशातील रेहरा माफी खेड्यातील आहे.

धर्मांतराचे व्यापक रॅकेट उद्ध्वस्त

  • ईडी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केले जमालुद्दीनचे धर्मांतर रॅकेट उद्ध्वस्त
  • या बाबाकडे प्रचंड मालमत्ता आणि रोख रक्कम असल्याचे तपासात उघड
  • धाडीत सापडलेल्या अनेक अवैध मालमत्तांच्या कागदपत्रांची छाननी होणार

Comments are closed.