वर्ल्ड कप एक्झिटनंतर इजिप्तची रडारड! अर्जेंटिनाला झुकते माप दिल्याचा इजिप्शियन फेडरेशनचा आरोप, पंचांविरुद्ध फिफाकडे तक्रार

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ‘राऊंड ऑफ १६’ चे सामने पार पडले. यामध्ये मंगळवारी (७ जुलै) अटलांटा स्टेडियममवर अर्जेंटिना आणि इजिप्त संघ भिडले. या सामन्यात अर्जेंटिनाने स्पर्धेच्या इतिहासातील जबरदस्त पुनरागमन करण्याची कामगिरी केली आणि सामना ३-२ ने जिंकला. या सामन्यात पंचांनी अर्जेंटिनाच्या बाजूने निकाल दिल्याने इजिप्त फेडरेशनने फिफाकडे तक्रार दाखल केली आहे.

आफ्रिकन संघाने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी घेत गतविजेत्याला धक्का दिला. त्यानंतर त्यांना वाटले त्यांची आघाडी दुप्पट झाली, मात्र VAR द्वारे तो गोल रद्द करण्यात आला. काही वेळानंतर इजिप्तने पुन्हा एक गोल करत आघाडी २-० अशी केली. यावरून अर्जेंटिना स्पर्धेबाहेर पडण्याच्या स्थितीत होता, मात्र अर्जेंटिनाने शेवटच्या जवळपास १३ मिनिटांमध्ये तीन गोल करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.

सामन्यात घडलेल्या वादग्रस्त निर्णयांबद्दल इजिप्त संघाचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन आणि स्टार फॉरवर्ड मुस्तफा झिको यांनी सामन्यानंतर सामना अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी अर्जेंटिनाला झुकते माप दिल्याचा आरोप करत ही स्पर्धा अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी यांच्यासाठीच होती, असा दावा केला.

इजिप्तने १-० आघाडी घेतल्यानंतर VAR च्या हस्तक्षेपामुळे त्यांचा दुसरा गोल नाकारण्यात आला, असा दावा हसन यांनी केला. तसेच त्यांनी असेही म्हटले की, एन्झो फर्नांडिसने अर्जेंटिनाचा विजयी गोल करण्याच्या काही क्षणांआधी, स्टॉपेज टाइममध्ये त्याच्या संघाला पेनल्टी दिली जायला हवी होती.

“मी पुन्हा कधीही विश्वचषक पाहणार नाही, कारण या स्पर्धेत न्याय नाही”, असे इजिप्तच्या प्रशिक्षकाने जाहीर केले. (Egyptian Federation has filed a complaint with FIFA against referee after their loss vs Argentina in World Cup 2026)

संतप्त हसन यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रेफरी फ्रान्स्वा लेटेक्सियर आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर टिका केली. ते म्हणाले, “आम्हाला आदर किंवा निष्फळ खेळ दिसला नाही. एक पेनल्टी नाकारण्यात आली आणि जी आमच्यासाठी पेनल्टी म्हणून तपासली जायली हवी होती, तिचे VAR द्वारे पुनरावलोकनही झाले नाही. आश्चर्यकारक म्हणजे दुसरा गोल कोणत्याही कारणास्तव अवैध ठरवण्यात आला.”

“हे सगळं पैशांसाठी आहे. मेस्सीने स्पर्धेत राहावं अशी त्यांची इच्छा आहे. फुटबॉलमध्ये, स्वार्थापोटी मैदानाबाहेर अनेक गोष्टी घडतात. जे घडलं ते अन्यायकारक होतं. इजिप्त पात्र होण्यास पात्र होता. अर्जेंटिनाविरुद्ध आमचा संघ अधिक चांगला होता,” असेही हसन यांनी पुढे म्हटले आहे.

या वादग्रस्त शेवटानंतर इजिप्त आपल्या विश्वचषक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत अमेरिकेतून परतले. त्यांनी १९३४ नंतर दुसऱ्यांदा बाद फेरी गाठली. तसेच राऊंड ऑफ ३२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपला बाद फेरीतील पहिला विजय नोंदवला. ही त्यांची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Comments are closed.