रेल्वे अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू
आगीच्या अफवेने प्रवाशांनी मारल्या उड्या : दुसऱ्या ट्रेनची धडक बसल्याने दुर्दैवी मृत्यू
वृत्तसंस्था/ मुरैना
मध्यप्रदेशमधील मोरेना जिह्यातील हेतमपूर आणि घेर रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. आग लागल्याच्या अफवेनंतर घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढून उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेस थांबवल्यानंतर, काही प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातालकोट एक्स्प्रेसची त्यांना धडक बसल्यामुळे आठ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका निष्पाप मुलाचा समावेश असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू केली आहे. अपघातामुळे मुख्य दिल्ली-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ग्वाल्हेरहून मोरेनाकडे जात होती. याचदरम्यान एका प्रवाशाने डब्यात आग लागल्याची माहिती दिल्याने डब्यात घबराट पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि अनेक जण खाली उतरले. दरम्यान, बाजूच्याच मार्गावरून धोलपूरहून येणारी पातालकोट एक्स्प्रेस जात असताना तिची काही प्रवाशांना धडक बसली. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली. माहिती मिळताच, जीआरपी, आरपीएफ आणि मोरेना पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अपघातानंतर मार्गावर अनेक गाड्या थांबवण्यात आल्या, तर बाधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. नंतर रेल्वेमार्ग मोकळा करण्यात आला आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. हा अपघात एका अफवेमुळे झाला आहे की अन्य कोणती कारणे आहेत, हे तपासण्यासाठी पोलीस आणि रेल्वेची पथके सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत.
Comments are closed.