दिल्लीत आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, तीन अल्पवयीन मुलांना अटक

नवी दिल्ली: दिल्लीतील ओखला परिसरातून एक अत्यंत क्लेशदायक आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे, ज्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी १२ ते १३ वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका महिलेने ओखला इंडस्ट्रियल एरिया पोलीस ठाण्यात फोन करून आपल्या मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तिच्या आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मुलीशी बोलून संपूर्ण घटनेची माहिती गोळा केली.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुलीने सांगितले की आरोपी मुलांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले होते, जिथे शनिवारी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना फक्त त्याच दिवशी घडली नसल्याचंही मुलीने सांगितलं. तिने सांगितले की, गुरुवारी आणि शुक्रवारीही मुलांनी तिला एका निर्जनस्थळी नेले होते, तेथे त्यांनी तिचे कपडे काढायला लावले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्यांनी तिला धमकावले होते.

डॉक्टरांनी पुष्टी केली

यानंतर मुलीने हिंमत एकवटून संपूर्ण घटना आईला सांगितली. हे ऐकून आई खूप अस्वस्थ झाली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली.

यानंतर पोलिसांनी मुलीला आणि तिच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केली, जेणेकरून मुलीला मानसिक आधार मिळावा आणि सुरक्षित वाटावे. तसेच प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी सावधगिरीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.

चौकशीनंतर तिन्ही आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले. प्राथमिक चौकशीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिघांनाही अटक केली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सर्व बाबी लक्षात घेऊन पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान तीनही आरोपी मुलांनी शाळा सोडल्याचेही समोर आले.

या कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 70 अन्वये सामूहिक बलात्काराचा आणि कलम 351 अंतर्गत गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी बनवलेल्या POCSO कायद्याचे कलम 6 देखील लागू करण्यात आले आहे. हे कलम गंभीर लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये लागू केले जाते. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments are closed.