जोपर्यंत चौकशी होत नाही, तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा: एकनाथ खडसे
जळगाव : पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जागा 300 कोटींना पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केल्याचा दस्त समोर आला आहे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीनं 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांमध्ये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्ष ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे. यामुळं या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यातील 40 एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन केली आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पुण्यातील जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
Eknath Khadse on Ajit Pawar : एकनाथ खडसे काय म्हाणाले?
पार्थ पवारांचा व्यवहार झाला आहे त्यात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी आहे ,हे आता तरी दिसत आहे, एकनाथ खडसे यांनी म्हटलं. राज्य सरकारनं हा व्यवहार रद्द केला पाहिजे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. व्यवहार रद्द करण्याची कारणं सांगताना एकनाथ खडसे म्हणाले ही जमीन महारवतनाची आहे. महार वतनाची जमीन खरेदी करायची असते तेव्हा महसूल आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. या ठिकाणी महसूल आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही.या मूळ कारणासाठी हा व्यवहार रद्द होऊ शकतो.
दुसरं असं आहे, जी स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, ती करताना जी कागदपत्रं दिली आहेत. ती कागदपत्रंच बनावट आहेत. एक लाख रुपये भागभांडवल कंपनीचं आहे. त्या कंपनीनं 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी कशी केली. 300 कोटी रुपये आले कसे, कोणाच्या खात्यात गेले, असे अनेक प्रश्न निर्माण होतात, असं एकनाथ खडसे म्हणाले.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हे प्रकरण अजित पवार यांच्या मुलाचं आहे. मी महसूलमंत्री असताना माझ्या परिवाराचं सांगण्यात आलं होतं.या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळं चौकशी समिती काय करेल, असं सांगता येत नाही. सरकारचं सरकारच्या मुलाची चौकशी करेल आणि त्यातून काही तथ्य बाहेर येईल असं नाही. या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, त्यातून गौडबंगाल बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
जोपर्यंत चौकशी होत नाही, तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट खरी आहे. चौकशीत प्रशासनिक कारवाई होईल. या व्यवहार ज्याच्या आशीर्वादानं झाला त्याच्यावर काय कारवाई करणार आहात, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केली.
अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीसांनी 70 हजार कोटी रुपयांचे पुरावे दाखवले होते. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणाले होते. राष्ट्रवादी बरोबर युती नाही नाही, असं फडणवीस म्हणाले होते. यामुळं सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असं एकनाथ खडसे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.