Eknath Khadse On Honeytrap एक बटण दाबले तर देशात हाहाकार उडेल, एकनाथ खडसे यांचा इशारा

महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता असलेला प्रफुल्ल लोढा याच्याकडे हनी ट्रॅपचे सगळे व्हिडीओ आहेत, एक बटन दाबले तर देशात हाहाकार उडेल, असा खळबळजनक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी आज दिला.

प्रफुल्ल लोढा हा जळगावच्या जामनेरचा निवासी असून भाजपमध्ये गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जातो. लोढाला हनी ट्रॅपमध्ये अटक झाली होती. याच लोढाने गिरीश महाजन आणि सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेल्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गेल्या वर्षी तक्रार केली होती. महाजनांच्या व्हिडीओवरून त्या अधिकाऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याची लोढाची तक्रार होती, असा दावा खडसे यांनी केला आहे. त्यासंदर्भात लोढा याने स्वतः एक व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ खडसे यांनी आज प्रसारमाध्यमांना दाखवला. ट्रायडंट हॉटेलमध्ये काय घडले होते हे माहिती असल्याचे लोढाने त्या व्हिडीओत सांगितल्याचे खडसे म्हणाले.

ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मांडीवर जाऊन प्रफुल्ल लोढा नंतर कसा बसला? नेमके काय घडले… त्याच्याजवळ असे काय होते ज्याने देशभरात तहलका होणार होता, अशा प्रश्नांची सरबत्तीही एकनाथ खडसे यांनी केली.

स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करू शकणार नाहीत, म्हणून एसआयटी स्थापन करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली.

Comments are closed.