भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील खदखद ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर येऊ लागली आहे. दोघांमधून विस्तव जात नसल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट झाले असतानाच शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांनी आज भाजपवर गंभीर आरोप केला. भारतीय जनता पक्षाने आमचं कंबरडं मोडलं, आम्हाला गुलाम बनवलं जातंय, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा सोलापूरच्या सांगोला मतदारसंघात शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्याला भाजपची फूस होती, असा शिंदे गटाचा दावा आहे. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून भाजपवर थेट आरोप केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रामाणिकपणे मदत करूनही भाजपने विधानसभेत आपला विश्वासघात केला. पण भाजपने कितीही फसवले तरी आमची लढणारी अवलाद आहे, पैशाच्या जिवावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका, असा इशारा पाटील यांनी भाजपला दिला आहे.
बापूला कुणी फसवू शकणार नाही
एकनाथ शिंदे यांनीही शहाजीबापूंची री ओढत भाजपवर टीका केली. बापूला किती वेळा फसवणार, एकदा-दोनदा फसवाल, पण आता बापूला कुणी फसवू शकणार नाही, असे म्हणत शिंदे यांनी भाजपबद्दलची आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.
काही माध्यमे वेडी झालीत… तसं काही घडलंच नाही ः फडणवीस
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांमधून होत आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘हा वेडय़ांचा बाजार सुरू आहे आणि काही माध्यमे वेडी झाली आहेत. हुतात्मा स्मारकारवर मी आणि शिंदे गेलो होतो तेव्हा येताना आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जात आहेत त्यांनी सांगितले आणि मी कुठे जात आहे हे मीसुध्दा सांगितले. कालच्या कार्यक्रमातही आमच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याचे ठरले होते. पण स्टेजवर आणि येताजाताना आम्ही भेटलो. त्यामुळे आम्ही न बोलण्यासारखे काही घडलेच नाही. जे लोक तसे दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत.’
आता नगरपालिकेच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून येऊन भाजपवाल्यांनी गुंडशाही सुरू केली आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि भाजपची कुत्री–मांजरम मला घाबरवायला निघाली आहेत. – शहाजीबापू पाटील
Comments are closed.