मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंची चाटूगिरी आणि लाचारी; राज ठाकरे यांचा हल्ला

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर नमो टूरिझम सेंटर्स उभारण्याच्या योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आज जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करावी याला काही मर्यादा आहे की नाही? मला सत्ता मिळावी, मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी ज्यांना ज्यांना खूश करावे लागेल ते ते करायचे एवढेच शिंदेंचे धोरण आहे. खाली किती चाटूगिरी चाललीय हे खुद्द पंतप्रधानांनाही माहीत नसेल, असा सणसणीत टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.
मनसेच्या मेळाव्यात दाखवलेल्या मतचोरीच्या डेमोचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला दिला. मतदार याद्यांसोबतच ईव्हीएमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोक आपल्यालाच मतदान करत आहेत. पण या भानगडींमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतोय. अख्खा देश याबद्दल बोंबलतोय. याच प्रक्रियेतून हे सत्तेत येतात आणि हवी तशी सत्ता राबवतात, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील आग दिल्लीला कळू द्या!
‘मतदार याद्या स्वच्छ करून नंतरच निवडणुका घ्या अशी आमची मागणी आहे. पण या सगळय़ा गोष्टी लपवायच्या आणि निवडणुका घ्यायच्या असा प्रकार सुरू आहे. ‘मॅच तो फिक्स है,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘येत्या 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली आहे ते दिल्लीला कळू द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.
 
			 
											
Comments are closed.