सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेसात लाखांचा गंडा, शिंदेंचे पीए प्रभाकर काळे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात नोकरी घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नांदेड येथील एका तरुणाला शासकीय सेवेत लिपीक पदावर भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 7 लाख 65 हजार रुपये उकळण्यात आले. त्याची मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेऊन फॉरेस्ट गार्ड म्हणून नोकरी मिळाल्याचे बनावट नियुक्ती पत्रही दिले. ट्रेनिंगसाठी नागपूर, नाशिक आणि सातारा येथेही पाठवले. मात्र तिथे ट्रेनिंग झालेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर या तरुणाच्या मावशीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीए प्रभाकर काळे याच्यासह विश्वनाथ गच्चे, स्नेहल कोळी, मनोहर चोरगे आणि साईनाथ व्हटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तळोजा येथे राहणाऱ्या वर्षा भुताळे यांनी तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात गेले असता तिथे विश्वनाथ गच्चे यांच्याशी भेट झाली होती. तुमचे काही काम असले तर मुख्यमंत्र्यांचे पीए प्रभाकर काळेंच्या माध्यमातून ते करून देऊ, असे तेव्हा गच्चे म्हणाले. त्यानंतर बहिणीचा मुलगा रितेश कांबळे याला नोकरी लावण्याची विनंती केली. त्यानुसार गच्चे यांनी प्रभाकर काळे यांच्याकडे नेले. त्यामुळे गच्चे यांच्यावर विश्वास बसला. बहिणीच्या मुलाला शासकीय सेवेत नोकरी लावण्यासाठी गच्चे याने 20 लाख रुपयांची मागणी केली. मात्र नंतर सात लाख 65 हजार रुपयांत बोलणी पक्की झाली. त्यानुसार गच्चे यांच्या बँक खात्यात 7 लाख 25 हजार रुपये ऑनलाईन पाठवले आणि 40 हजार रुपये रोख दिले. पैसे मिळाल्यानंतर विश्वनाथ गच्चे, साईनाथ व्हटकर, स्नेहल कोळी, मनोहर चोरगे यांनी रितेशची मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेतली. नंतर पुन्हा सातव्या माळ्यावर मुख्यमंत्र्याच्या दालनात नेऊन कोठे पोस्टिंग झाली तेही दाखवले, असे भुताळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मुलाखत झाल्यानंतर गच्चे आणि व्हटकर यांनी रितेशला जी.टी. रुग्णालयात नेऊन तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री फाईलवर स्वाक्षरी करीत नसल्याची बतावणी करून त्याला फॉरेस्ट गार्ड म्हणून नियुक्ती झाली असल्याचे बनावट नियुक्तपत्र आणि प्रशिक्षणाचे पत्र दिले. नंतर रितेशला फॉरेस्ट गार्डच्या जॉईनिंगसाठी नागपूर जिह्यातील रामटेक येथे नेण्यात आले. तेथून मेडिकल करण्यासाठी पुन्हा नाशिक येथे आणले. त्यानंतर आठ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी तो गच्चे आणि व्हटकर यांच्याबरोबर सातारा जिह्यातील पाटण येथे आला. रितेशचे पाटण येथे ट्रेनिंग झालेच नाही. उलट रितेशला एकटय़ाला सोडून व्हटकरने तिथून पळ काढला. त्यानंतर भुताळे यांनी गच्चे आणि इतर लोकांशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, अशी धमकी त्यांनी दिली, असा आरोप भुताळे यांनी तक्रारीत केला.

40 तरुणांच्या मुलाखती

रितेश कांबळे याची ज्या दिवशी मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत झाली, त्याच दिवशी त्या ठिकाणी सुमारे 40 तरुण मुलाखतीसाठी आले होते. त्यांच्याकडून प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये नोकरीसाठी घेण्यात आले असल्याचा आरोप वर्षा भुताळे यांनी एफआरआयमध्ये केला आहे. नोकरीसाठी आलेल्या या तरुणांशी मी बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गच्चे आणि स्नेहल कोळीने मला दमदाटी केली होती, असेही भुताळे यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

खात्यातील पाच कोटी दाखवले

एकनाथ शिंदे यांच्या दालनात मी गेले असता गच्चे याने त्याच्या खात्यातले पाच कोटी रुपये मला दाखवले. पुण्यातील बिल्डरने तळ्याच्या कामाचे बिल काढल्यानंतर पाच कोटी माझ्या खात्यात आणि पाच कोटी प्रभाकर काळे यांना दिल्याचे सांगितले, असा आरोपही भुताळे यांनी केला.

Comments are closed.