Eknath Shinde’s birthday wishes from Pratap Sarnaik
प्रताप सरनाईक
कर्मयोगी, संघर्षयोद्धा, लोकनेता महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 9 फेब्रुवारी रोजी 61वा वाढदिवस आहे. त्यांचा आणि माझा सामाजिक-राजकीय जीवन प्रवास एकत्रित सुरू झाला. त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल लिहिण्यासारखे-सांगण्यासारखे खूप आहे. शांत, मन मिळावू, जनतेसाठी 24 तास काम करण्याची आणि प्रचंड मेहनतीची तयारी, विकासाची दूरदृष्टी, प्रत्येक कामाचे बारकाईने नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी अशा कितीतरी गोष्टी शिंदे साहेबांबद्दल बोलता येतील. अगदी तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे, त्यांना आधार देणारे शिंदे साहेब फक्त शिवसेनेचे नाही तर, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख बनले आहेत. शिंदे साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, कारण त्यांनी आजवर समर्पित भावनेने स्वतःला झोकून देऊन ठाण्यासह राज्याचा विकासरथ पुढे नेला आहे. त्यांच्या वयाच्या एकसष्टीनिमित्त आणखी विकासकामे करण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.
घरची गरीब परिस्थिती असल्याने अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र, त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. अत्यंत सर्वसामान्य घरातून आलेल्या एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. शिंदे साहेबांना त्या काळात आनंद दिघे साहेबांचा चांगला सहवास लाभला. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे साहेबांच्या मनात विश्वास निर्माण केला. आपल्या कामामुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे एकनाथ शिंदे ठाण्यात सर्वपरिचित झाले. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना अगदी तरुण वयात म्हणजेच 1984 साली त्यांना किसन नगर येथील शाखाप्रमुखपद देण्यात आले. पक्षात सक्रिय झाल्यावर समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली; शिवाय लोकांच्या अडी-अडचणीला ते धावून गेले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमार खाल्ला, तुरुंगवासही भोगला.
माझी आणि शिंदे साहेबांची सामाजिक-राजकीय कारकीर्द एकत्रच सुरू झाली. मी त्यावेळी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एनएसयूआय’चे काम करीत होतो तर, शिंदे साहेब शिवसेनेचे. 1992मध्ये त्यांना नगरसेवकपदाचे तिकीट मिळाले नाही. पण शिंदे साहेबांनी आपले पक्षकार्य आणि समाजकार्य निष्ठेने सुरूच ठेवले. 1997च्या ठाणे महापालिका निवडणुकीत आनंद दिघे साहेबांनी शिंदे यांना नगरसेवकपद दिले. शिंदे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले. पुढे ते दुसऱ्यांदा नगरसेवक, सभागृह नेते झाले. त्यावेळी जरी आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्ह्यातील सर्वच लोक देवासारखे मानत असल्याने ठाण्याचे राजकारण कधीही कलुषित झाले नाही. सगळ्यांची राजकारणापलीकडची मैत्री वाढत गेली, टिकली. तशीच शिंदे साहेब आणि माझेही मैत्रीचे संबंध कायम राहिले.
नगरसेवक म्हणून मी आणि शिंदे साहेबांनी एकत्रित राजकीय प्रवास सुरू केला. पुढे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी शिंदे साहेबानी प्रचंड मेहनत घेतली. खेडोपाडी, गावोगावी पक्षाचा विस्तार केला. विविध आंदोलने, खटले यात गुन्हे दाखल झालेल्या शेकडो शिवसैनिकांना कायदेशीर मदत तर केलीच, शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी घेतली. प्रत्येक शिवसैनिकांना स्वतःच्या परिवारासारखा मानणारा असा दिलदार, दमदार आणि प्रामाणिक असा आमचा नेता आहे. हजारो कार्यकर्त्यांना सुरुवातीच्या काळात शिंदे साहेबांनी आधार तर दिलाच पण असंख्य कार्यकर्ते घडवले. ‘कार्यकर्ते घडविणारा नेता’ किंवा ‘क्रियाशील कार्यकर्ते बनविण्याची फॅक्टरी’ असे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मी 2008मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि 2009मध्ये आमदार झालो. ठाणे-मीरा भाईंदरच्या जनतेचे विविध प्रश्न, क्लस्टर, पाणी, मेट्रो, वाहतूक कोंडी, उड्डाणपूल यासाठी त्यावेळी आम्ही एकत्रित आंदोलने केली. मितभाषी, संयमी, पण जनतेसाठी आंदोलनात आक्रमक असलेल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तेव्हा ठाण्याचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. ठाण्याचे आमदार म्हणून राज्य सरकारकडून विविध विकासकामे मंजूर करून आणली. आजचे ‘बदलते विकसित ठाणे’ हे शिंदे साहेबांच्या तेव्हपासूनच्या दूरदृष्टीचा आणि मेहनतीचा परिणाम आहे.
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कितीही वेळ कष्ट करण्याची तयारी, नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, सर्वाना सोबत घेऊन राजकारणात यशस्वी व्हायचे कौशल्य अशा अनेक एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. धर्मवीर दिघे साहेबांच्या निधनानंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्या व वाढविण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. आजही शिवसैनिक आणि ठाणेकर जनता त्यांच्यात दिघे साहेबांची छबी बघते. दिघे साहेब गेल्यानंतर ठाण्यात शिवसेना पक्ष वाढवून तसेच टिकवून ठेवण्यात शिंदे साहेबांचे योगदान मोलाचे आहे. ‘शिवसेनेचे ठाणे – ठाण्याची शिवसेना’ हे समीकरण आजही कायम आहे. कारण मंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करायची संधी मिळाली तरी, ठाण्याला शिंदे साहेबांनी गेल्या 10 वर्षांत जराही अंतर दिले नाही. राज्यात आलेले कोणतेही नैसर्गिक संकट असो की, एखादी गंभीर समस्या शिंदे साहेब तिथे सगळी मदत घेऊन पोहोचलेले आपण पाहिले आहे.
एकनाथ शिंदे साहेब हे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झाले. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संघटनेची ताकद वाढविताना ठाण्यात सुरुवातीला सत्तेच्या माध्यमातून ठाण्याच्या विकासाला गती दिली. पुढे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांनी कर्तबगारीची छाप उमटवली. महाराष्ट्राचे गेले अडीच वर्षं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात माझ्या विधानसभा मतदारसंघात ठाणे-मीरा भाईंदरला भरभरून विकासनिधी मिळाला. त्याचबरोबर राज्यातही मेट्रो, हायवे, समृद्धी महामार्ग, मुंबईतील कोस्टल रोड यासारखे विकास प्रकल्प पूर्ण झाले आणि राज्य सरकारने शेकडो ऐतिहासिक निर्णय घेतले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही खऱ्या अर्थाने 2 कोटी 40 लाख महिलांना आधार देणारी ऐतिहासिक योजना शिंदे साहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून आणली आणि तिची तत्काळ अंमलबजावणीही करून दाखवली. तसेच, मी सुचविलेली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ लागू झाली. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक सरकारच्या अनुदानातून देशातील आपल्या इच्छित तीर्थस्थळी दर्शन घेऊ शकत आहेत. शिंदे साहेबांनी सर्व समाज घटकांसाठी विविध क्रांतिकारी निर्णय घेतले. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने विकासाची उंच भरारी घेतली आहे.
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीने 2024च्या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि ‘न भूतो न भविष्यती’ असे यश महायुतीला मिळाले. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 60 आमदार प्रचंड मतांनी विजयी झाले. अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर, ‘कॉमन मॅन’ म्हणून अहोरात्र लोकांमध्ये घेतलेली मेहनत, जनतेत वाढवलेला विश्वास, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा करोडो लोकांना दिलेला प्रत्यक्ष लाभ, ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम आणि जनकल्याणकारी योजना यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे यश महायुतीला मिळाले.
महायुतीच्या सत्तेची दुसरी टर्म सुरू झाली असताना उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांची ही एकसष्टी साजरी होत आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आजही ते उपमुख्यमंत्री नाही तर ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणूनच काम करत आहेत.
अत्यंत धाडसी निर्णय घेऊन त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी वाटचाल केली. राज्यात विकासाच्या मोठ्या योजना यशस्वी केल्या. शिवसेनेच्या लाखो कार्यकर्त्यांना न्याय देताना रात्रंदिवस कष्ट केले. ‘न थांबणारी मशिन’ असे त्यांचे व्यक्तीमत्व महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळात चर्चिले जाते. प्रबळ इच्छाशक्ती, प्रत्येक क्षण आणि क्षण जनतेसाठी समर्पित करून लोकांसाठी काम केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शिंदे साहेबांची लोकप्रियता प्रचंड वाढली. करोडो बहिणींचा लाडका भाऊ, लाखो गरीब गरजू रुग्णांना सहज प्रक्रियेने वैद्यकीय सहायता मिळवून देणारा, आरोग्यसेवा पुरविणारा त्यांचा हक्काचा माणूस… म्हणूनच त्यांना ‘लोकनाथ’ म्हणतात.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. राज्याच्या विकासाची गाडी सुसाट पुढे नेली. रात्रंदिवस कष्ट करण्याच्या आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी सर्व संकटाचा सामना केला. विधानसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून राज्यात पक्षाचा प्रचार करून 60 आमदार विजयी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाची विजयी पताका अशीच फडकत राहील, यात कोणतीही शंका नाही.
मुंबईतील कोस्टल रोड म्हणजेच ‘सागरी किनारा मार्ग’ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत पूर्ण झाला. त्यांनी राज्य एसटी महामंडळाच्या कारभारात लक्ष घालून महिलांसाठी प्रवासात पन्नास टक्के भाड्यात सवलत देणारा अत्यंत महत्वाचा सामान्य प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला. हा निर्णय खऱ्या अर्थाने कष्टकरी सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारा ठरला. सार्वजनिक वाहतुकीत राज्यात ‘गाव तेथे एसटी ही फक्त एसटी’ महामंडळाची घोषणा होती. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनविण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. आपला सहकारी आमदार चौथ्यांदा प्रचंड मतांनी विजयी होत असताना शिंदे साहेबांनी मला ‘परिवहन’ सारख्या अत्यंत महत्वाच्या खात्याची मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे आणि पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, त्यासाठी मी कटिबद्ध आहे.
स्वतःचे शहर आणि गृह जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले म्हणून आज बदलेले विकसित ठाणे दिसत आहे. ठाण्याचा पूर्ण झालेला, होत असलेला विकास आणि नजीकच्या काळात पूर्ण होणारे मोठे विकास प्रकल्प पहाता ठाणे जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास वाटतो. ठाण्यासोबतच पालघर जिल्ह्यासाठीही शिंदे साहेबांनी अनेक कामे केली. जिल्ह्यातील वाढवण बंदराचा प्रश्न मार्गी लावला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला त्यांनी गती दिली. या कामातील अनेक अडचणी दूर केल्या आणि बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू केले.
ठाणे, मीरा-भाईंदरचा कायापालट हा फक्त आणि फक्त शिंदे साहेबांची विकासाची दृष्टी आणि मेहनतीमुळे शक्य झाला आहे. नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री म्हणून मीरा-भाईंदर शहरासाठी त्यांनी जवळपास 3 हजार कोटींच्या विकास प्रकल्पाना मान्यता दिली. मुंबई महानगरीच्या विकासाचे प्रमुख प्रकल्प त्यांच्या कारकिर्दित राबविले जात आहेत. अखंड कामाचा ध्यास असलेले तसेच लोकसंग्रह करणारे शिंदे साहेब हे करोडो कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करत आहेत. सर्वसामान्य जनतेशी असलेली थेट नाळ हे त्यांचे बलस्थान आहे. मुख्यमंत्री म्हणून वर्षा निवासस्थानी 24 तास लोकांची प्रचंड गर्दी असायची; कारण शिंदे साहेबांना कधीही माणसाचा कंटाळा नाही. त्यांच्या बंगल्यावर लोकांची वर्दळ कायम असते. आजही त्यांच्या ठाणे असो की, मुंबई येथील घरी अहोरात्र सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते आपले प्रश्न – कामे घेऊन विश्वासाने येतात. आजही ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी तसेच मंत्रालयात मुंबईत त्यांच्याकडे लोकांचा प्रचंड ओघ सुरू आहे.
एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तबगारीमुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द वैभवशाली बनली आणि त्यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचा विस्तार यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज ते उपमुख्यमंत्री असले तरी, त्यांच्या लोकप्रियतेत किंचितही खंड पडलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे, अजित पवार हे सत्तेची कारकिर्द अधिक गतीमान करीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बलवान नेतृत्वाने शिवसेना पक्षाचे सामर्थ्य वाढत असून सत्तेच्या वर्तुळात देखील ते दिवसेंदिवस प्रभावी होत आहेत.
मी आणि शिंदे साहेब आमची गेल्या 30-35 वर्षांची मैत्री, कौटुंबिक संबंध आहेत. आज पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांनी मला राज्याचा परिवहनमंत्री हे महत्वाचे पद दिले आहे. माझ्या आयुष्यातील हे सर्वोच्च पद आहे. या पदाला न्याय देण्यासाठी आणि राज्यातील परिवहन व्यवस्था बळकट, आधुनिक, सक्षम करण्यासाठी मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करीत आहे. त्यात त्यांची साथ, मार्गदर्शन मला मिळत आहे.
एका शाखाप्रमुख पदापासून शिंदे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कामाची प्रबळ इच्छाशक्ती, धडाडी, कठोर मेहनत, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, सर्वसामान्य लोकांमध्ये सतत मिसळत राहणे यामुळे त्यांचे नेतृत्व प्रत्येकाला भावते. एखादे काम हाती घेतले की, ते शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक अशा अनेक गुण वैशिष्ट्यांमुळे त्यांची वाटचाल ही यशस्वी झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचा विजयाचा झेंडा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यापुढेही सतत राज्यभर फडकत राहणार आहे.
एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. संघर्षयोद्धे आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते राज्यातील एक शक्तिशाली नेते बनले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत याचा विशेष अभिमान वाटतो. त्यांच्या नेतृत्वात राज्याची आणि शिवसेना पक्षाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. त्यांच्या एकसष्ठीला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना शतायुष्य देवो आणि त्यांच्या हातून नव्या महाराष्ट्राच्या विकासाचे असेच काम होत राहो, या हृदयापासून शुभेच्छा!!!
(लेखक राज्याचे परिवहनमंत्री आहेत)
Comments are closed.