स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी  जूनमध्ये रणधुमाळी

कोरोनाचे संकट आणि लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे गेली चार-साडेचार वर्षं रखडलेल्या विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक येत्या जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासोबतच नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे 17 जागांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात रणधुमाळी उडणार आहे.

कोरोनाचे संकट, इतर मागासवर्गाचे आरक्षण यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपूनही त्यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करता येत नव्हत्या. आता राज्यातील बहुतांश स्थानिक निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांबाबतचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला सादर केला आहे. येत्या 12 मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या 9 जागांची आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जून महिन्यात अपेक्षित आहे. निवडणूक होऊ घातलेल्या 17 मतदारसंघांच्या नावाची आणि संबंधित मतदारसंघातील मतदारांच्या संख्येची माहिती आयोगाला पाठवण्यात आली आहे. या 17 मतदारसंघातील काही मतदारसंघांत जिल्हा परिषदेचे सदस्य नसले तरी येथे 75 टक्के मतदार संख्येची पूर्तता होत असल्याने निवडणूक घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम मे महिन्यात जाहीर होऊन प्रत्यक्ष मतदान जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

विधान परिषदेच्या अहिल्यानगर, सोलापूर यासारख्या  स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी संपली आहे. तर काहींची मुदत 2024मध्ये संपली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस आणि या वर्षीच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्याने विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागले आहेत.

नागपूरमध्ये पोटनिवडणूक

निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांमध्ये नागपूर पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे 2022मध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र 2024मध्ये ते  विधानसभेवर निवडून आल्याने नागपूरची जागा सध्या रिक्त आहे. या जागेची मुदत 1 जानेवारी 2028पर्यंत असल्याने येथे पोटनिवडणूक होईल.

मतदारसंघ आणि मतदारसंख्या

सोलापूर (595), अहिल्यानगर (461), ठाणे-पालघर (1054),  जळगाव (526),  सांगली-सातारा (853), नांदेड (432),  यवतमाळ (405),  पुणे ( 798),  भंडारा-गोंदिया (457),  रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग (947), नाशिक (581), वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली (977), अमरावती (453),  धाराशीव-लातूर-बीड (1051), परभणी तथा हिंगोली (468) छत्रपती संभाजी नगर तथा जालना (580) आणि नागपूर (761)

Comments are closed.