2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी होणार मतदान! 3 डिसेंबर मतमोजणी आणि निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये लाखो दुबार नावे आहेत. त्याचे ढीगभर पुरावे विरोधी पक्षांनी दिले. याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी केली. त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्याऐवजी निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घाई झाली असून नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल आज वाजला. 2 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली.

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीद्वारे 6859 सदस्य आणि 277 अध्यक्षांची निवड होणार आहे. निवडणूक होत असलेल्या क्षेत्रांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक होत असलेल्या नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे. उर्वरित 236 नगर परिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे अकोल्याच्या पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होत असलेल्या नगर पंचायतींमध्ये 15 नवनिर्मित नगर पंचायती आहेत आणि 27 नगर पंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. एकूण 147 नगर पंचायतींपैकी 105 नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही, अशी माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली.

मतदार यादीतील नाव, केंद्र पाहता येणार अॅपवर

मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र याबाबत उमेदवारांची शपथपत्रे प्रत्येक मतदाराला पाहता यावीत यासाठी निवडणूक आयोगाने मोबाईल अॅप विकसित केले आहे.

दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार

दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टारचे चिन्ह असणार आहे. अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना कोणत्या केंद्रावर ते मतदान करणार आहेत त्याची माहिती घेतली जाईल. संबंधित मतदाराने काहीच प्रतिसाद दिला नाही तर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्याच्याकडून इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नाही किंवा करणार नाही असे हमीपत्र घेतले जाणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

एका मतदाराला तीन-चार मते द्यावी लागणार

नगर परिषदेच्या एका प्रभागात दोन जागा असल्याने एका मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. उमेदवारांची संख्या विषम असल्यास एका प्रभागात तीन-तीन मतेही द्यावी लागतील. थेट अध्यक्षपदासाठीही मतदान होणार असल्याने एका मतदाराला तीन ते चार जागांसाठी मत द्यावे लागू शकते, असे वाघमारे यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज ऑनलाईन

या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या http://mahasecelec.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करता येणार आहे. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्रे दाखल करता येऊ शकणार आहेत. संकेतस्थळावर अर्ज आणि शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्यावर स्वाक्षरी घ्यावी लागेल आणि ती प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱयाकडे दाखल करावी लागेल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

  • एकूण मतदार ः 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
  • मतदान केंद्रे ः 13 हजार 355
  • निवडणूक निर्णय अधिकारी ः 288
  • निवडणूक अधिकारी व कर्मचारी ः 66775

निवडणुकीसाठी पुरेशा ईव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिट उपलब्ध आहेत.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ‘अ’ वर्ग नगर परिषद

थेट अध्यक्ष – 15 लाख रुपये, सदस्य – 5 लाख रुपये

'ब' वर्ग नगरपरिषद

थेट अध्यक्ष – 11 लाख 25 हजार, सदस्य – 3 लाख 50 हजार रुपये

'अ' वर्ग नगरपरिषद

थेट अध्यक्ष – 7 लाख 50 हजार रुपये, सदस्य – 2 लाख 50 हजार रुपये

नगर पंचायत

थेट अध्यक्ष – 6 लाख रुपये, सदस्य – 2 लाख 25 हजार रुपये

असा असेल निवडणूक कार्यक्रम

नोव्हेंबर

10 उमेदवारी अर्ज
17 अर्जाची अंतिम मुदत
18 अर्जांची छाननी
21 आक्षेप नसल्यास अर्ज माघारी घेता येणार
25 अपिलावर निर्णयाअंती
अर्ज मागे घेण्याची मुदत
26 चिन्ह वाटप-अंतिम यादी

डिसेंबर

02 मतदान
03 काढा
10 निकालाचे राजपत्र

दुबार मतदारांवरून आयोगाची भंबेरी

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. मतदार यादीतील घोळाच्या मुद्दय़ावरून आयुक्तांची अक्षरशः भंबेरी उडाली. बोगस मतदारांबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांना शेजारी बसलेले सचिव आणि जनसंपर्क अधिकाऱ्याचे सहकार्य घेण्याची वेळ आली. मतदार यादीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात चेंडू टाकून हात झटकले. दुबार मतदार आहेत अशी कबुली त्यांनी दिली; मात्र त्यांची संख्या सांगण्यास टाळाटाळ केली.

सचिवालय जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे यांच्यावर प्रश्नांची चौफेर सरबत्ती झाली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दोन वेळा भेट घेऊन निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुरावे दिले होते. त्यावर काय कारवाई केली याबाबत पत्रकारांनी वाघमारे यांना विचारले. त्यावर मतदार याद्यांमधील घोळाचा विषय वाघमारे यांनी बाजूलाच ठेवला. 15 ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात यावी अशी विरोधी पक्षांच्या नेत्यांची मागणी होती, त्याबाबत आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले असून 1 जुलै ते 15 ऑक्टोबरपर्यंतची यादीही मागवली आहे, मात्र अद्याप आयोगाकडून उत्तर आलेले नाही, अशी सारवासारव वाघमारे यांनी केली.

आम्ही यादी तयार करत नाही, फक्त वापरतो

सुलभ शौचालय, नवी मुंबईतील आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो बोगस मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. मिठाईवाल्याच्या दुकानाच्या पत्त्यावर 40-40 मतदारांची नोंद असल्याचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुराव्यानिशी समोर आणले होते. याबाबत निवडणूक आयुक्त वाघमारे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदार यादी येते. ते यादी तयार करतात. आम्ही फक्त ती वापरतो. एक तारीख ठरवून त्या दिवसापर्यंतची मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरतो. दुबार मतदार असतील तर त्याची तपासणी करतो. या यादीत दुबार आणि तिबार मतदानाबद्दल कारवाई करता येते. ती कारवाई आम्ही केली आहे. काही चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर तेसुद्धा आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाही, तेसुद्धा नाव आम्ही टाकतोय, असे स्पष्टीकरण वाघमारे यांनी दिले.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दुबार मतदान झाले. ही निवडणूक आयोगाची चूक होती का अशा प्रश्नावर निवडणूक आयुक्त निरुत्तर झाले. त्याबाबत भाष्य करण्यासही त्यांचे धाडस झाले नाही.

व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही

2005 पासून देशात निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर होत आहे. अनेक न्यायालयांमध्ये ईव्हीएमला आव्हान दिले गेले, पण कुठेही त्याविरोधात निर्णय आलेला नाही, असे निवडणूक आयुक्त यांनी सांगितले. व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचे कोणत्याही अधिनियमात नाही. बहुसदस्यीय संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटची व्यवस्थाच नसल्याने या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम राबवणार आहे. त्यात पोस्टर्स, बॅनर्स, भित्तिचित्रे, चित्ररथ यांचा समावेश असेल, असे वाघमारे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात आमिष दाखवण्यासाठी पैसे आणि मद्य वाटप केले जाते. ते रोखण्यासाठीच आचारसंहिता लागू असते, त्याचप्रमाणे सर्व बँका, पतपेढय़ा यांच्या व्यवहारांवरही आयोगाचे लक्ष असेल असे ते म्हणाले.

दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार टाकले आहेत, असे आयुक्त म्हणाले. त्यावर दुबार मतदारांची संख्या किती असा प्रश्न विचारला असता, दुबार नव्हे…संभाव्य दुबार असे म्हणत ती संख्या आता आयोगाकडे नसून त्यावर काम चालू आहे. मतदानापूर्वी 2 दिवस ती संख्या समजू शकेल, असे सांगितले.

निवडणूक आयोगाचा कारभार दस नंबरी

दुबार-तिबार मतदारांच्या नावासमोर स्टारचे चिन्ह करणार असे सांगणारा निवडणूक आयोग ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही याचे उत्तर निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेले नाही. कारण आयोगाचा कारभारच दस नंबरी असून तो सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे. या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती; परंतु निवडणूक आयोग मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

डबल स्टार नव्हे, डबल मतदारांची यादी जाहीर करा! – रोहित पवार

आयोग म्हणतोय, दुबार मतदारांना डबल स्टार करू, पण जर तुम्हाला माहीत आहे की मतदार यादीत अशी नावे आहेत तर त्यांची यादी जाहीर का करत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलो. आयोगाने दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करावी आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रिया राबवावी, अन्यथा जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असे ते म्हणाले.

Comments are closed.