‘एसआयआर’साठी 10 दिवसांची मुदतवाढ, 8 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन पडताळणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहीम राज्यभरात सुरू आहे. राज्याच्या काही भागांत खास करून मुंबई व कोकणातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात एसआयआर मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यानुसार 8 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात येणार असून 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

‘एसआयआर’ मोहिमेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरित मतदार, मृत व्यक्तींची नावे यांची तपासणी करून पात्र मतदारांची नोंद कायम ठेवण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रात 30 जून ते 29 जुलैपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मतदारसंघांत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाऱया पडताळणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. यामुळे महाराष्ट्रात ‘एसआयआर’ मोहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांकडून करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीसाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसआयआरच्या कामासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी निर्धारित कालावधीत गणना प्रपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केले आहे.

मतदार यादी पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम

  • बीएलओ गृहभेटी        – 8 ऑगस्टपर्यंत
  • मतदान केंद्र पुनर्रचना – 8 ऑगस्टपर्यंत
  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध    – 17 ऑगस्ट
  • दावे आणि हरकती दाखल       – 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध   – 19 ऑक्टोबर

राज्यात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेमध्ये अनेक अडचणी येत होत्या. ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. राज्य सरकारने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारीच मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेऊन या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. बृहन्मुंबई सार्वनिजक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनीही आयोगाला पत्र लिहिले होते.

Comments are closed.