ऐनवेळी अंबरनाथ, बारामतीसह 20 नगर परिषदांच्या निवडणुकांना ब्रेक, आता 20 डिसेंबरला मतदान; 21 तारखेला निकाल

अवघ्या काही तासांवर आलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांना अचानक ब्रेक लागला आहे. अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 20 ठिकाणच्या निवडणुका न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका आता 20 डिसेंबर रोजी होणार असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु ज्या नगर परिषदा आणि तेथील प्रभागांतील निवडणुकांबाबत न्यायालयात अनेक अपील आहेत, त्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवकपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. अपील असल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचे आणि निवडणुकांच्या नव्या तारखा ठरवण्याचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित

अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. तर कुळगाव–बदलापूर नगरपालिका क्षेत्रात काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या निकालाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ अशा सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रभागांत नव्या कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.

बारामती नगरपरिषद निवडणूक 20 डिसेंबरला

पुणे जिह्यातील बारामती नगरपरिषदेची निवडणूकही लांबणीवर गेली आहे. आता 20 डिसेंबरला बारामती नगरपरिषदेच्या सर्व जागांवरती मतदान होणार आहे. याचिका प्रलंबित असल्याने तेथील निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

पुढे ढकललेल्या निवडणुका

 अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी नगरपरिषद आणि सात प्रभाग

 चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषद

 गडचांदूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 8 ब आणि मूल नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10 ब

 गोंदिया नगर परिषदेतील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16

 यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभाग
 नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिका तर भोकर, पुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एक प्रभाग
 सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपरिषद
 धाराशीव शहरातील प्रभाग 2 अ, 7 ब आणि 14 ब  सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिका
 पालघर नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक 1 ब मधील नगरसेवक पदाची होणारी निवडणूक निवडणूक आयोगाने सद्यस्थितीत स्थगित करत असल्याचे आदेश पारित केले आहेत. मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून 1 ब हा प्रभाग सोडून इतर 29 प्रभागातील नगरसेवकपदांची निवडणूक नियमानुसार 2 डिसेंबर रोजीच होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

निवडणुका पुढे ढकलण्याची कारणे

 अपिलांची सुनावणी प्रलंबित
 अपिलाच्या निकालास उशीर
 निकालाची प्रत मिळाली नाही
 निकालात तशा सूचना

Comments are closed.